
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नकाशाशिवाय अतिरिक्त बांधकाम, क्लिनिक व पॅथॉलॉजिकल लॅबच्या नावाखाली रुग्णालय सुरु केल्याने डॉ. कर्पे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
संगमनेर ः बॉम्बे नर्सिंग अॅक्टचे प्रमाणपत्र रद्द असताना संगमनेर शहरातील विद्यानगर प्रभागातील रहिवासी वस्तीत बेकायदा सुरु असलेल्या डॉ. अमोल कर्पे यांच्या साईनाथ हॉस्पिटलवर उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी ( ता. 12 ) वैद्यकीय अधीक्षक, पोलिस व नगरपरिषदेच्या पथकाने सील करण्याची संयुक्त कारवाई केली.
या बाबत अधिक माहिती अशी, या प्रभागातील रहिवाशी परिसरात बेकायदा बांधकाम करुन, स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही, बेकायदेशीर रुग्णालय सुरू होते. यामुळे डॉ. कर्पे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांचे बॉम्बे नर्सिंग अॅक्टचे प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले होते.
या रुग्णालयाचे बांधकाम सुरू असताना 2013 मध्ये कटारिया व इतरांनी आक्षेप घेतल्यानंतर चौकशी समितीने केलेल्या पहाणीत मंजूर नकाशापेक्षा नियमबाह्य बांधकाम केल्याचे निदर्शनास आले होते.
याची गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी 2018 मध्ये साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द केली होती. त्यानंतर नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने नकाशाशिवाय अतिरिक्त बांधकाम, क्लिनिक व पॅथॉलॉजिकल लॅबच्या नावाखाली रुग्णालय सुरु केल्याने डॉ. कर्पे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
या नंतरही रुग्णालय सुरुच ठेवल्याने व्यापारी विजयकुमार कटारिया यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी 27 जानेवारी 2020 रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचे आदेश दिले होते.
त्यानुसार काल संगमनेरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, डॉ. अमोल जंगम, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनी पोलिस बंदोबस्तात रुग्णालय सील केले.
संपादन - अशोक निंबाळकर