हसावं का रडावं ः फोनवर आली २५ लोकांच्या जेवणाची अॉर्डर अन...

मनोज जोशी
Friday, 11 September 2020

शहरातील हॉटेलचालकास 25 माणसांचे जेवणाचे पार्सल तयार ठेवा, दुपारी 12 वाजता घेऊन जातो, अशी ऑर्डर कोणीतरी फोनवर दिली. त्यानुसार हॉटेलचालकाने जेवण तयार केले. मात्र...

कोपरगाव : या अॉनलाईनच्या जमान्यात कोण कोणाला आणि कसा गंडा घालील याचा तपास लागायचा नाही. कोपरगावातील एका हॉटेलचालकास लुटल्याची कहाणी ऐकाल तर हसावं का रडावं हे कळायचं नाही.

शहरातील प्रसिद्ध भोजनालय चालकाला कोणीतरी फोनवर 25 माणसांच्या जेवणाची ऑर्डर दिली. पैसे खात्यात जमा करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाचे डेबिट कार्ड, बॅंकेची माहिती व ओटीपी घेऊन खात्यातून रोकड लंपास केली.

शहरातील आणखी तीन व्यावसायिकांनाही असेच फोन आले. मात्र, ते वेळीच सावध झाल्याने वाचले. या चालकास तयार केलेले जेवणाचे दान करावे लागले. दुसरीकडे पैसेही गमवावे लागले. मात्र, प्रतिष्ठेपायी या प्रकाराची तक्रार देण्यास चालक पुढे आला नाही.

शहरातील हॉटेलचालकास 25 माणसांचे जेवणाचे पार्सल तयार ठेवा, दुपारी 12 वाजता घेऊन जातो, अशी ऑर्डर कोणीतरी फोनवर दिली. त्यानुसार हॉटेलचालकाने जेवण तयार केले. मात्र, पार्सल घेण्यास कोणीच आले.

हेही वाचा - भाऊ फक्त परवानगी द्या, कंगणाचं नाकच कापतो

काही वेळाने परत चालकास फोनवर बॅंकेचे डिटेल, डेबिट कार्ड क्रमांक सांगा, ऑनलाईन पैसे पाठवितो, असे सांगितले. हॉटेल व्यावसायिकाने डेबिट कार्ड, ओटीपीही दिला. त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला. मात्र, किती रक्कम गेली, या बाबत त्याने कुठेही वाच्यता केली नाही.

दरम्यान, शहरातील आणखी तीन हॉटेलचालकांनाही असेच जेवण, नाश्‍ता पाकिटासाठी फोन आला होता. त्यातील एकानेही 25 लोकांचे जेवण बनवले, तेही त्यास दान करावे लागले. मात्र, समव्यावसायिकांना कोणीतरी गंडवत असल्याचे लक्षात आल्यावर इतरांनी ऑर्डर घेण्यास नकार दिला. या सर्वाचा करता करविता कोण, हे अजून गुलदस्त्यात आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hotelier cheated in Kopargaon