भाऊ फक्त आदेश द्या, त्या कंगणा राणावतचं नाकच कापतो!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

कंगणा राणावतने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचीच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर चर्चा आहे. नगरच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नेत्याने प्रशांत पाटील गडाख यांनी आदेश दिला तर कंगणाचे नाकच कापून आणतो, असा पण केला आहे.

नगर ः बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री कंगणा राणावत हिने महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेते तसेच सर्वसामान्यांनी तिच्यावर टीका सुरू केली आहे.

नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी अर्णब गोस्वामी व कंगणा राणावतचा दुटप्पीपणा उघडकीस आणला होता. दैनिक सकाळ, ई-सकाळला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी परखडपणे मते मांडली होती. 

हेही वाचा - प्रशांत पाटील गडाख यांनी फाडला कंगणा-अर्णबचा बुरखा

महाराष्ट्राच्या जिवावर मोठे होऊन परत महाराष्ट्रालाच बदनाम करणाऱ्यांवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करण्याची गुर्मी येते कुठून, असा जाबही त्यांनी विचारला होता. गडाख पाटील हे राज्याच्या राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात मोठे नाव आहे.

प्रशांत पाटील गडाख यांचे ज्येष्ठ बंधू शंकरराव गडाख पाटील हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

अॅड. सतीश पालवे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात पैसे, नाव, प्रतिष्ठा कमावली, महाराष्ट्रातील जनतेने जिचे चित्रपट डोक्यावर घेतले तीच कंगना राणावत आता महाराष्ट्राला "पाक व्याप्त काश्मीर " म्हणत असेल तर तो समस्त महाराष्ट्राचा अपमान आहे. 

आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ती अारे-कारे असं अपमानास्पद बोलत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आमचे नेते प्रशांतभाऊ गडाख यांनी आदेश दिला तर या कंगनाचे नाक कापण्याची मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, असा पण क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे संस्थापक आणि प्रशांतभाऊ गडाख यांचे कट्टर समर्थक असलेल्या पालवे यांनी केला आहे.

आदरणीय प्रशांत पाटील गडाख यांनी आदेश दिला तर 100 कार्यकर्ते घेऊन कंगनाच्या मुंबईतील बंगल्यात घुसण्याचा चंग अॅड. पालवे यांनी बांधला आहे. 

आदेश निघेल की नाही साशंकता

मराठी माणूस आणि मराठी मातीचा अपमान झाल्याने स्वाभीमानी कार्यकर्ते चिडणे स्वाभाविक आहे. गडाख कुटुंबाचा सुसंस्कारी राजकारणी म्हणून राज्यात नावलौकिक आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख पाटील यांच्यामुळे ती ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे चिरंजीव प्रशांत हेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करीत आहेत. वृृक्षारोपण, नेत्रदान चळवळ अशा रचनात्मक कामात ते अग्रेसर आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांना असा आदेश देतील, याची शंकाच आहे. उलट खडसावण्याचीच शक्यता अधिक.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Revolutionary Peasants Party leader Palve Kangana will cut Ranaut's nose