नगरच्या ह्युम मेमोरिअल चर्चला आहे हा इतिहास

भरत मोहोळकर
Friday, 25 December 2020

अमेरिकेतील बेल कंपनीकडून भारतात विशेष बनावटीच्या पाच घंटा आणल्या होत्या. पैकी एक घंटा ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये बसविली होती. ही घंटा पंचधातूपासून बनविल्याचे जाणकार सांगतात.

नगर ः अमेरिकन मिशनरींनी मुंबईनंतर नगर शहरात पाऊल टाकले. त्यावेळी गॉर्डन हॉल चर्चममध्ये उपासनेसाठी जागा कमी पडू लागली. त्यामुळे सर रॉबर्ट ऍलन ह्यूम यांच्या पुढाकारातून ह्यूम मेमोरियल चर्चच्या बांधकामास सुरवात झाली. 

लोकवर्गणीतून 1902मध्ये ह्यूम मेमोरियल चर्चचे बांधकाम सुरू झाले. हे बांधकाम पाश्‍चिमात्य व गौथिक पद्धतीने केले आहे. त्यासाठी त्यांनी वांबोरी (ता. राहुरी) व मिरी (ता. पाथर्डी) येथील खाणीतील दगडांचा वापर केला. चर्चच्या छतासाठी सागाचे लाकूड वापरले आहे.

बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात लाकडी बाके बसविली. त्यासाठी शिसम लाकडाचा वापर केला. शिसम हे लाकूड दक्षिण भारतातील मलबार येथून रेल्वेने आणले व त्या लाकडांचा बाकासाठी वापर करण्यात आला. 

हेही वाचा -  मंत्री गडाखांमुळे शनिशिंगणापूरची राजकीय साडेसाती सरली

अमेरिकेतील बेल कंपनीकडून भारतात विशेष बनावटीच्या पाच घंटा आणल्या होत्या. पैकी एक घंटा ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये बसविली होती. ही घंटा पंचधातूपासून बनविल्याचे जाणकार सांगतात. घंटेचा आवाज 2 किलोमीटरपर्यंत सहज पोचतो. 

सर रॉबर्ट ऍलन ह्यूम यांनी 1902मध्ये चर्चच्या बांधकामाला सुरवात केली. 1906मध्ये चर्चचे बांधकाम पूर्ण झाले. त्यामुळे 24 ऑक्‍टोबर 1906 रोजी ह्यूम मेमोरियल चर्च उपासनेसाठी समर्पित करण्यात आले. त्यास 114 वर्षे पूर्ण झाली, तरी चर्च अगदी सुस्थितीत आहे.

ह्यूम मेमोरियल चर्चबद्दल लोकांच्या मनात आकर्षण आहे. मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात ह्यूम मेमोरियल चर्चची नोंदणी केलेली आहे. युनायटेड चर्च ऑफ नॉर्दन इंडिया संस्थेंतर्गत ही चर्च कार्यरत आहे. 

ह्यूम मेमोरियल चर्च हे पाश्‍चिमात्य व गौथिक पद्धतीने बांधली आहे. चर्चला 114 वर्षे पूर्ण होऊनही ती सुस्थितीत आहे. नगरच्या वैभवशाली इतिहासातील ही आकर्षक वास्तू आहे. 
- जॉन्सन शेक्‍सपियर, सचिव, ह्यूम मेमोरियल चर्च , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Hume Memorial Church in Ahmednagar has a glorious history