पतीची विहिरीत उडी.. पाठोपाठ पत्नी नि बहिणही आली.. काय घडलं असं

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शनिवारी ज्ञानेश्वर याच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्याने पत्नी सविता हिच्यासह खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. उपचारानंतर घरी येऊन झोपले असतानाच...

 कोपरगाव : तालुक्‍यातील कोकमठाण ग्रामपंचायतीजवळील रेलवाडी गावात ह्रदय हेलावून टाकणारी घटना घडली. एका दाम्पत्यात शनिवारी (ता.27) रात्री काही तरी झालं...तो अचानक घरातून बाहेर पळत आला नि विहिरीत उडी मारली. क्षणाचाही विचार न करता पाठोपाठ पत्नीनेही उडी टाकली. पाठोपाठ त्याची बहिणही आली. त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला. तो ऐकून शेजारी-पाजारी धावले..परंतु पुढे घडलं ते भयानक होतं. 

हेही वाचा : दहा बरे झाले... बारा नव्याने बाधले 

या बाबत तुकाराम कचरू खोतकर यांनी कोपरगाव पोलिसांत फिर्याद दिली. त्या पती-पत्नीचा मजुरीवरच उदरनिर्वाह होता. शनिवारी ज्ञानेश्वर याच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्याने पत्नी सविता हिच्यासह खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेतले. उपचारानंतर घरी येऊन झोपले असताना, पती-पत्नीमध्ये अज्ञात कारणावरून बिनसले. 

त्यामुळे रागाच्या भागात ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय 30) बाहेर आला आणि त्याने विहिरीत उडी मारली. त्या पाठोपाठ त्याची पत्नी सविताने (वय 25) उडी घेतली. दोघे वहिरीत बुडायला लागले. त्यामुळे शेजारी असलेल्या बहिणीला ही माहिती समजली. तिने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, तीही बुडू लागली. 
या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ जागे झाले. तातडीने मदतीसाठी धावले. काहींनी ताबडतोब विहिरीत दोर सोडला. तिने दोर पकडला. त्यामुळे ती वाचली. मात्र, या दुर्घटनेत पती-पत्नीचा मृत्यू झाला. 

मृतदेह ग्रामीण रुग्णालयात 
उत्तरीय तपासणीसाठी दाम्पत्याचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले होते. या बाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband and wife commit suicide in well

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: