खाकीमुळे डागाळली 'नेवाशा'ची प्रतिमा! एक नव्हे, तर दोन प्रकरणे पाठोपाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police

खाकीमुळे डागाळली 'नेवाशा'ची प्रतिमा! 2 प्रकरणे पाठोपाठ

नेवाशा (जि.अहमदनगर) : नेवाशातील ऑडिओ क्‍लिप (audio clip) प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. नेवाशात अशी एक नव्हे, तर दोन प्रकरणे पाठोपाठ घडली. या दोन्ही प्रकरणांमुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड प्रकरणाची आठवण सर्वांना झाली. या प्रकरणांमुळे संपूर्ण खाकीवर (maharashtra police) आता थेट आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीची प्रतिमा खाकीमुळे डागाळत असल्याने, असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आता सखोल चौकशीची अपेक्षा व्यक्त होत आहे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये, या म्हणीप्रमाणे आता नेवाशातील प्रकरणाचा तपास व्हावा, असा मतप्रवाह सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. वाळूतस्कर व पोलिस निरीक्षक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्‍लिप समाजमाध्यमावर (social media) व्हायरल झाल्यानंतर अशा प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे.

ऑडिओ क्‍लिप प्रकरणाने राज्यात खळबळ

ऑडिओ क्‍लिप प्रकरणे नगर जिल्ह्यासाठी नवे नाहीत. याअगोदरही असे अनेक प्रकार घडले असून, या ऑडिओ क्‍लिपमुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हाणामाऱ्या, तर काही ठिकाणी सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, पोलिस दलात ऑडिओ क्‍लिपद्वारे अप्पर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या प्रकरणाने शिरकाव केला. तो आता तळागाळापर्यंत पोचतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, या म्हणीप्रमाणे पोलिस दलातील कारभारात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, राठोड प्रकरणानंतर काहींनी धडा न घेता आपला उद्योग सुरूच ठेवला असल्याचे नेवाशातील ऑडिओ क्‍लिप प्रकरणावरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: शुभमंगल सावधान‍! लग्नाच्या बाजारात दिखाऊ माल, फसवा धंदा

या क्‍लिप नेमक्‍या कोणाच्या आहेत, कोणी कोणाला दिल्या? कोणी व्हायरल केल्या?

वाळूतस्कर व पोलिस निरीक्षक यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्‍लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी त्यांची तातडीने मुख्यालयात बदली केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच त्यात वाळूचे वाहन सोडण्यावरून आर्थिक व्यवहाराच्या एका पोलिसाच्या संभाषणाची ऑडिओ क्‍लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे संतांच्या भूमीत वाळूवरून खिसे गरम होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, हे खिसे गरम होण्याचे उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, आर्थिक निकष बदलल्यामुळे तर आता ऑडिओ क्‍लिप व्हायरल केल्या जात नाही ना, असाही प्रश्‍न अनेकांना पडू लागला आहे. या ऑडिओ क्‍लिप प्रकरणांचा सखोल तपास करूनही, या क्‍लिप नेमक्‍या कोणाच्या आहेत, कोणी कोणाला दिल्या? कोणी व्हायरल केल्या? त्या व्हायरल करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे, अशा एक ना अनेक प्रश्‍नांचा विचार करून तपास होण्याची अपेक्षा नेवासकरांमधून व्यक्त होत आहे. ऑडिओ क्‍लिपमुळे आता इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली असून, प्रत्यक्ष भेटून बोलण्यावर आता अनेकांनी भर दिला आहे.

अनेकांना धसका..

आर्थिक व्यवहारांच्या संभाषणांचा पोलिस दलासह इतर शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. आपलेही संभाषण कोणी व्हायरल करू शकते, अशी भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: पालिकेच्या ‘त्या’ ठेक्याचे पैसे कोणाच्या घशात?

टॅग्स :Ahmednagarpolice