esakal | नगरमध्ये मृत्यूदर वाढला आणि मसणवटेही वाढले

बोलून बातमी शोधा

अमरधाम अहमदनगर

नगरमध्ये मृत्यूदर वाढला, आणि मसणवटेही वाढले

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नगर ः शहराबाहेरील कोरोना बाधित मृतदेहांवर नगर शहराबाहेर अंत्यविधी करण्यात यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे शनिवारी(ता. 24) ला केली होती. त्यानुसार केडगाव स्मशानभूमी, नागापूर, नवनागापूर व सावेडी कचरा डेपो या चार ठिकाणे शहराबाहेरील कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यानुसार आगामी दोन ते तीन दिवसांत या ठिकाणी कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू होतील, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्‍त यशवंत डांगे यांनी दिली.

शहरातील नालेगाव अमरधाममध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा ताण येत आहे. शिवाय या परिसरातील नागरिकांना धुराचा त्रास होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे कोरोना बाधित मृतदेहांवरील अंत्यसंस्कार व्यवस्थापन विकेंद्रीत व्हावे, यासाठी आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, महापालिका आयुक्‍त शंकर गोरे व महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, उपायुक्‍त डांगे यांनी काल (रविवारी) शहरातील व लगतच्या चार जागांची पाहणी केली.

हेही वाचा: दिलासादायक ः बाधितांचा आकडा घटला, काळजी कायम

यात केडगाव स्मशानभूमी, नागपूर, नवनागापूर व सावेडी कचरा डेपोची पाहणी करण्यात आली. सावेडी कचरा डेपोच्या जागेत स्मशानभूमी व उद्यान करण्यात यावे, अशी मादणी संपत बारस्कर व सावेडीतील नगरसेवकांची मागणी आहे. सध्या सावेडी कचरा डेपो बंद करण्यात आला असून तेथील कचऱ्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे ही जागा सध्या रिकामी आहे. आज दुपारी आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली.

या जागेत काही सुधारणा करून गुरुवारपासून या जागेत नगर शहराबाहेरील कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने तातडीने कामे सुरू करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिले. महापालिकेने केलेल्या तयारी संदर्भात महापालिका आयुक्‍तांनी आमदार संग्राम जगताप व जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.

बातमीदार - अमित आवारी