
International Women's Day 2023 : हॅपी वूमन्स स्ट्रीटवर उद्या धम्माल
अहमदनगर : कल्पतरू समूह आणि दैनिक सकाळ यांच्या वतीने ‘हॅपी वूमन्स स्ट्रीट’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. ५) होणाऱ्या हा अनोख्या कार्यक्रमास रॉयल एन्फिल्ड, कराचीवाला हे प्रायोजक लाभले आहेत. रेडिओ पार्टनर म्हणून ‘रेडिओ ऑरेंज’ आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष, तर सातवे सत्र आहे. हॅपी वूमन्स स्ट्रीटमध्ये महिलांना रॅम्प वॉक, झुम्बा डान्स, फूड, शॉपिंग, मेडिटेशन, मल्लखांब,
योगा अशा भरगच्च कार्यक्रमांचा विनामूल्य आनंद लुटता येणार आहे. फ्युजन ॲकॅडमी, बी फिट लॉन्ज, हनी डान्स ॲकॅडमीचे सदस्य उपस्थित महिलांची झुम्बा आणि सामूहिक नृत्यांद्वारे फिटनेसबाबत जनजागृती करणार आहेत.
या उपक्रमात अधिक रंग भरण्यासाठी व्हिक्टर डान्स ॲकॅडमीचे विद्यार्थी आकर्षक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. महावीर मल्लखांब योगा ट्रेनिंग सेंटर आणि श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने योग आणि मल्लखांब घेण्यात येणार असून त्यात एकूण दीडशे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे आणि आप्पा लाढणे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम होणार आहे.
गायक गिरिराज यांचा परफॉर्मन्स होणार आहे. या सत्रातील आकर्षण म्हणजे स्टेजवर प्रेक्षकांच्या भेटीला खास एक सरप्राईज कार्यक्रमही ठेवला आहे.
या उपक्रमात गिर्यारोहण आणि साहसी मोहिमा राबविणारे ट्रेक कॅम्प यांचाही विशेष स्टॉल असेल. त्याचबरोबर या उपक्रमात फ्री मेडिकल चेक-अप कॅम्पचेही आयोजन केले आहे. हॉटेल दी कॅसल यांच्या चविष्ट पदार्थांची पर्वणी असेल.
शहरातील शॉपिंग अॅप ‘सर्व’तर्फे महिलांसाठी खास मनोरंजनात्मक खेळ आणि स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे खास महिला पालकांच्या माहितीसाठी ऊर्जा गुरुकुलतर्फे शैक्षणिक जागृतीपर स्टॉल आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून उसंत घेत महिलांसाठी हा उपक्रम आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
निळ्या रंगाची थीम
या उपक्रमाची यंदाच्या वर्षातील थीम निळ्या रंगाची आहे. स्त्रियांच्या अमर्यादित शक्ती व आकांक्षांचे प्रतीक आहे. या उपक्रमातील सहभाग निःशुल्क असून, निळ्या रंगातील ड्रेस, साडी परिधान करून जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होत हॅपी वूमन्स स्ट्रीटचा आनंद घ्यावा, असे आवाहन उपक्रमाच्या मुख्य आयोजक कल्याणी गौरव फिरोदिया यांनी केले आहे.
कुठे होणार कार्यक्रम ?
सावेडी परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावर रविवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत ''हॅपी वूमन्स स्ट्रीट'' होणार आहे. दरम्यान, या वेळी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे आठवडाभर गजबजलेल्या रस्त्यावर धमाल करण्याची मजा महिलांना या निमित्ताने अनुभवता येणार आहे.