कोरोनामुळे व्यवसाय बदल, रिक्षाचालकांवर आली भंगार, भाजीविक्रीची वेळ

सुनील गर्जे
Sunday, 25 October 2020

कुकाणे व परिसरातील 148पैकी 86 रिक्षाचालकांनी फळे-भाजीपाला विक्री, तर उर्वरित 62 जणांनी भंगार व कापूस खरेदी-विक्री, पाच-सहा जणांची टोळी करून कापूस वेचणी, तर काहींनी साखर कारखान्यांवर ऊसतोडीचा मार्ग स्वीकारला आहे. 

 

नेवासे: कोरोना संकटात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली. या संकटावर मात करण्याकरिता कुकाणे व परिसरातील अनेक रिक्षाचालकांनी फळे व भाजीपाल्याची विक्री सुरू केली आहे. 

कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय बुडाले. लॉकडाउनदरम्यान बससेवा बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प होती. शहरासह मोठी बाजारपेठ असलेल्या गावांतील अंतर्गत वाहतूकही बंद असल्याने रिक्षा बंदच होत्या. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक स्रोत बंद झाले. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या आहेत. त्यामुळे कर्जाचा डोंगर उभा राहिला.

तालुक्‍यातील कुकाणे, भेंडे, भानसहिवऱ्यासह परिसरातील अनेक गावांत एकूण 148 कुटुंबीयांची गुजराण रिक्षा व्यवसायावर अवलंबून आहे. त्यातील 86 रिक्षाचालकांसह मालकांनी कोरोनावर मात करीत फळे-भाजीपाला विक्री सुरू केली. त्यांनी कुकाणे, भेंडे, भानसहिवरे, नेवासे फाटा येथील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्ली व खेडोपाडी जाऊन भाजीपाला व फळांची विक्री सुरू केली. त्यात सर्वाधिक कुकाणे येथील 54 रिक्षाचालक व मालक हा व्यवसाय करीत आहेत. 

62 रिक्षाचालकांनी शोधला वेगळा मार्ग 
कुकाणे व परिसरातील 148पैकी 86 रिक्षाचालकांनी फळे-भाजीपाला विक्री, तर उर्वरित 62 जणांनी भंगार व कापूस खरेदी-विक्री, पाच-सहा जणांची टोळी करून कापूस वेचणी, तर काहींनी साखर कारखान्यांवर ऊसतोडीचा मार्ग स्वीकारला आहे. 

लॉकडाउन सुरू झाल्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद झाला. त्यानंतरही प्रतिबंधक लस येईपर्यंत लॉकडाउन शिथिल होण्याची स्थिती नव्हती. आणखी वाट बघण्यापेक्षा फळविक्रीचा निर्णय घेतला. लॉकडाउनमध्ये केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरू होती. त्यामुळे फळे व भाजीपाल्याची विक्री सुरू केली. 
- युनूस नालबंद, रिक्षाचालक-मालक, कुकाणे 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It was time for the rickshaw pullers to sell vegetables