घरकुले बांधण्यात जामखेड अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

home

महाआवास योजनेअंतर्गत चार महिन्यांत तालुक्यात एक हजार ३२६ घरकुले पूर्ण करून जामखेड तालुक्याने अहमदनगर जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला.

Gharkul : घरकुले बांधण्यात जामखेड अव्वल

जामखेड - महाआवास योजनेअंतर्गत चार महिन्यांत तालुक्यात एक हजार ३२६ घरकुले पूर्ण करून जामखेड तालुक्याने अहमदनगर जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला. राज्यातही अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाआवास योजनेअंतर्गत राज्यभरात घरकुल बांधणीचे सर्वाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२२ पासून अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत विविध टप्पे ठरवून त्या टप्प्यांवर घरकुलांची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात आले. या अभियानाची आकडेवारी प्रशासनाने नुकतीच जाहीर केली असून, नगर जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांना धोबीपछाड देत १० हजार १९९ घरकुले पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यांत एक हजार ३२६ घरकुले पूर्णकरून जामखेड तालुका प्रथम क्रमांकावर, तर एक हजार २८२ घरकुले पूर्ण करून कर्जत तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे. घरकुलांचा विक्रमी टप्पा गाठत प्रशासनाने जामखेड व कर्जत तालुक्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जामखेडचा दबदबा कायम

पंचायत समितीसह नगरपरिषदेत प्रथम सर्वाधिक घरकुले पूर्ण करण्यात जामखेड पंचायत समितीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असतानाच, याच वर्षी जामखेड नगरपरिषदेने देखील घरकुल योजनेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. दरम्यान, गेल्या वर्षी घरकुल योजनेत जामखेडचा नाशिक विभागीय स्तरावर दुसरा क्रमांक आला होता.

दृष्टिक्षेपात जामखेड

  • घरकुले पूर्ण करण्यात जिल्ह्यात १३ टक्के वाटा

  • एक हजार ३२६ घरकुले पूर्ण

  • ३१ मार्चपर्यंत ६७३ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

घरकुल योजनेचा सर्वसामान्यांना लाभ मिळण्यासाठी जामखेड पंचायत समितीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी अविरत प्रयत्न केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आगामी काळात जामखेड तालुक्याचा राज्यात प्रथम क्रमांक आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

- प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, जामखेड

घरकुल योजनेतील जाहीर झालेली आकडेवारी नक्कीच कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी अभिमानास्पद आहे. याचे संपूर्ण श्रेय हे अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पदाधिकारी यांना जाते.

- रोहित पवार, आमदार