esakal | जायकवाडी धरण १०० टक्के भरण्याची स्थितीत असल्याने ऊस लागवडीला वेग
sakal

बोलून बातमी शोधा

As Jayakwadi dam is in a position to be 100 percent full sugarcane cultivation is in full swing

पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या आंतरमशागतीच्या कामाबरोबरच रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी पिकांसाठी राखून ठेवलेल्या जमीनीवर पूर्वमशागतीच्या कामाला वेग आला आहे.

जायकवाडी धरण १०० टक्के भरण्याची स्थितीत असल्याने ऊस लागवडीला वेग

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : पावसाने विश्रांती घेतल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या आंतरमशागतीच्या कामाबरोबरच रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. रब्बी पिकांसाठी राखून ठेवलेल्या जमीनीवर पूर्वमशागतीच्या कामाला वेग आला आहे. 

जायकवाडी धरण यंदा १०० टक्के भरण्याच्या स्थितीत असल्याने या परिसरात ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरु आहे. तालुक्यात यंदा विक्रमी ऊस लागवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यात यंदा जूनपासून पावसाचे प्रमाण चांगले असल्याने कपाशी, बाजरी, मूग, तुर ही खरीप पिके जोमात आहेत. मात्र पंधरा दिवसांपासून लागून असलेल्या संततधार पावसामुळे वापसा नसल्याने त्यातील खुरपणी, औत पाळी व खतं घालणी, फवारणी आदी कामे रखडली होती. 

गवतामुळे पिकांची वाढ खुंटली होती. तर सुर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडून त्यावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. आता आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने ही कामे उरकण्यात शेतकरी व्यस्त आहे. शिवाय रब्बीच्या ज्वारी, हरभरा या पिकांसाठी राखून ठेवलेल्या जमिनीत पूर्वमशागतीच्या कामाला वेग आला आहे.

पावसामुळे वाढलेल्या गवतावर तणनाशक मारुन गवत काढणे, औत पाळी घालणे, काडीकचरा जमा करून जमीन स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जमिनीत ओल भरपूर असल्याने पुन्हा पावसाला सुरुवात झाली तर रब्बीची पेरणी अशक्य होईल या धास्तीने पूर्वतयारीसाठी आखेगाव, वरूर, खरडगाव, फलकेवाडी, वडुले या शिवारात वेग घेतला आहे. बैल नसलेल्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरव्दारे मेहनत करावी लागत आहे. मात्र डिझेलची दरवाढ झाल्याने एकरी दोनशे ते तीनशे रुपये जास्त मोजावे लागत असल्याने हंगामाआधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

यंदा सर्वत्र जोरदार पावसामुळे नगर व नाशिक जिल्हयातील धरणे शंभर टक्के भरली असल्याने जायकवाडी धरणात 18611 क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 94.64 टक्के भरले असून येत्या काही दिवसात शंभर टक्के भरणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून या पट्टयात ऊस लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. ऊस बियाणे तोडणीसाठी सर्वत्र मजूर दिसत आहेत. अनेक ठिकाणी स-या पाडून शेतकरी ऊस लागवड करीत आहेत. येत्या काही दिवसात जायकवाडी पट्टयात विक्रमी ऊस लागवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शेवगाव तालुका हा एकेकाळी रब्बी ज्वारीचे आगार म्हणून ओळखला जात असे .ज्वारीसोबतच करडई, जवस, कारळ या तेलबियांचेही त्यातील आंतरपीक म्हणून मोठे उत्पादन घेतले जायचे. ज्वारीच्या कडब्याचाही जनावरांसाठी वर्षभर चारा म्हणून वापर होत असे. आता कपाशी तूर, मूग, सोयाबीन या रब्बीच्या नगदी पिकाकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याने रब्बीचे क्षेत्र हळूहळू् घटत चालले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर