पत्रकार रोहिदास दातीर यांची अपहरण करून हत्या, राहुरीत खळबळ

Journalist Rohidas Datir abducted
Journalist Rohidas Datir abducted

राहुरी  : शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून काल (मंगळवारी) दुपारी सव्वाबारा वाजता अपहरण केलेल्या एका साप्ताहिकाच्या संपादकाला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला.  काल रात्री पावणे अकरा वाजता राहुरी कॉलेज रस्त्याच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळला. नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात फॉरेन्सिक उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह हलविला आहे.

रोहिदास राधुजी दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) असे मृत पत्रकाराचे नाव आहे. रोहिदास स्कुटीवर (एमएच १२ जेएच ४०६३) घरी चालले होते. पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना बळजबरीने गाडीत बसवून अपहरण केले. घटनास्थळी त्यांची दुचाकी व पायातील चपला पडल्या होत्या. काल दुपारी तीन वाजता रोहिदास यांच्या पत्नी सविता दातीर (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात वाहना (एमएच १७ एझेड ५९९५) मधून अपहरण झाल्याचे दिसून आले. 

ते वाहन कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांच्या मालकीचे आहे. अपहरण झालेले दातीर व वाहनमालक मोरे यांचे मोबाईल स्विचऑफ होते. काल सायंकाळी दातीर यांच्या पत्नीने पुरवणी जबाबात "मोरे यांनी यापूर्वी दातीर यांना मारहाण केली होती. कारभारी, रावसाहेब व बाळासाहेब मांगुडे यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती." असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार मोरे याचा मुलगा व इतर तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

दरम्यान, काल रात्री पावणे अकरा वाजता दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर रोटरी रक्तपेढी जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला. मृताच्या गळ्याभोवती उपरणे व हाता-पायाला बेदम मारहाण केल्याचे दिसले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनि शिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल,  उपनिरीक्षक गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, निरज बोकील, श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक सानप, नगर येथील श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणातील वाहन रात्री नऊ वाजता आल्याचे पोलिसांना आढळले. नेमकी कोणत्या कारणासाठी हत्या केली, याचा तपास पोलिस करीत आहेत.

गळा आवळून खून
मृताचे हात-पाय मोडले आहेत. जबर मारहाण करून, गळा आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. मुख्य संशयित कान्हू मोरे पसार आहे. तीन-चार जणांनी अपहरण करून खून केला असण्याची शक्यता आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी मोरे याचा शोध सुरू आहे. 
- राहुल मदने, पोलीस उपअधीक्षक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com