बारस्करांकडून कळमकरांची "पोल'खोल 

अमित आवारी
Saturday, 18 July 2020

तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या काळातील, प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टीव्ही सेंटर ते झोपडी कॅंटीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामाची 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज केला. 

नगर : तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्या काळातील, प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी चौक, टीव्ही सेंटर ते झोपडी कॅंटीनपर्यंत अद्ययावत पथदिवे उभारणीच्या 50 पोलच्या कामाची 50 लाख रुपयांची निविदा काढून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज केला. 

अवश्‍य वाचा - महापालिकेची स्थायी समिती सभा होणार ऑनलाईन 

बारस्कर यांनी या भ्रष्टाचाराची पोलखोल आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन केली. नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, डॉ. सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, अजिंक्‍य बोरकर, बाबासाहेब गाडळकर, राजेंद्र मेहेत्रे, अमित खामकर उपस्थित होते. 

बारस्कर म्हणाले, की प्रत्यक्षात प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौकापर्यंत 48 पोल उपलब्ध आहेत. यामध्येही दोन पोल गहाळ आहेत. काही पोलवर दिवेही नाहीत. पथदिवे बसविल्यापासून त्यांना वीज मिळालेली नाही. एका पोलची किंमत 93 हजार रुपये आहे. झोपडी कॅंटीन, मकासरे हेल्थ क्‍लब, टीव्ही सेंटर या ठिकाणी तर पोलच बसविण्यात आले नाहीत. 

विनित पाऊलबुद्धे म्हणाले, की शहरातील जनतेच्या पैशांची उधळपट्टी अशा प्रकारे होत असेल, तर संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. 

पथदिव्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला धमकावून विद्यमान आमदारांनी काम बंद पाडले. कामच पूर्ण न झाल्याने या कामाची बिलेही ठेकेदाराला अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे घोटाळा कसा? या प्रकरणाची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. तपोवन व बोल्हेगाव रस्त्याच्या कामात मलिदा खाऊ न दिल्याने हे अशा खालच्या पातळीवर येऊन टीका करत आहेत. पथदिव्यांचे काम का थांबविण्यात आले, याचे उत्तर बगलबच्चे सोडण्यापेक्षा "त्यां'नी स्वतः द्यावे. 
- अभिषेक कळमकर, माजी महापौर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalamkar's "Polkhol" from Baraskar