पत्रकार पांडुरंग रायकर यांना कर्जतचा कोरोना योद्धा पुरस्कार

नीलेश दिवटे
Sunday, 3 January 2021

प्रशासन व व्यवस्थेचा ते बळी ठरले. यामुळे या रायकर कुटुंबाचे छत्र हरपले आहे. येथील प्रबोधनकार प्रतिष्ठानने रायकर कुटुंबियांचा जो सन्मान केला आहे.

कर्जत : प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोना योद्धा व त्यांच्या मातोश्री जिजाबाई रायकर यांना वीरमाता पुरस्कार माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी दयानंद कोरेगावकर महाराज होते. 

सामाजिक कार्यकर्ते सचिन पोटरे यांच्या प्रबोधनकार प्रतिष्ठानतर्फे स्मृतिचिन्ह व मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 51 हजार रुपये रोख मदत देण्यात आली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, संयोजक सचिन पोटरे, उपाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, ज्ञानेश्वर पठाडे महाराज, डॉ. सुनील गावडे, वैभव शहा, उपसभापती प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. 

प्रा. राम शिंदे म्हणाले, कोरोना काळात व त्यापूर्वी पत्रकार (कै) पांडुरंग रायकर यांनी अनेक सामाजिक विषयावर प्रकाश टाकला, अनेक समस्यांना वाचा फोडली ,कोरोना काळात काम करीत असताना त्यांना कोरोनाने गाठले. त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत.

प्रशासन व व्यवस्थेचा ते बळी ठरले. यामुळे या रायकर कुटुंबाचे छत्र हरपले आहे. येथील प्रबोधनकार प्रतिष्ठानने रायकर कुटुंबियांचा जो सन्मान केला आहे. त्यातून बोध घेत सदर कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची मदत करावी.

खासदार डॉ सुजय विखे पाटील म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून विविध माध्यमांच्या प्रतिनिधींचे कार्य अतुलनीय आहे. कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्‍यात घालीत, ताज्या घडामोडी त्यांनी समाजाच्या पुढे पोहोचवल्या.

हेही वाचा - सोनईत पुन्हा पेटला गडाख विरूद्ध गडाख संघर्ष

सचिन पोटरे म्हणाले, दरवर्षी समाजात विधायक काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आईला वीरमाता पुरस्कार देत सन्मानित करतो. त्यात मोठे मनस्वी समाधान मिळते.

या वेळी हभप दयानंद महाराज कोरेगांवकर, अरुण मुंडे, प्रतिभा भैलुमे, नामदेव राऊत यांची भाषणे झाली. 

पुरस्कार स्वीकारताना मुलाच्या आठवणीने आई च्या व पतीच्या विरहाने पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. या वेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karjat's Corona Warrior Award to journalist Pandurang Raikar