नेवाशातील कार्तिक एकादशी यात्रोत्सव रद्द ; संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचा निर्णय

सुनील  गर्जे
Wednesday, 9 December 2020

कार्तिक वद्य एकादशीची यात्रा उत्सव रद्द झाल्याने भाविकांनी श्रध्येपोटी या स्थानावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करु नये, घरीच सुरक्षित राहून माऊलीचा नामजप करावा, असे आवाहन गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे.  

नेवासे (अहमदनगर) : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील कार्तिक वद्य एकादशीला शुक्रवार (ता. ११) रोजी होणारी संत ज्ञानेश्वर माऊलींचा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान संस्थानने याबाबतचे पत्रही तालुका प्रशासनास दिले आहे. 

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
देशमुख महाराज म्हणाले, 'सध्या संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. श्री क्षेत्र नेवासे हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असल्याने कार्तिक वद्य एकादशीला मोठी यात्रा भरत असते. या दिवशी लाखोंच्या संख्येने माऊलींच्या 'पैस' खांबाच्या दर्शनासाठी येथे भाविक येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवीय जीवितास धोका असल्यामुळे या वद्य एकादशीला होणारी यात्रा उत्सव शासकीय आदेशाचे पालन म्हणून रद्द करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळींनी एकमताने घेतला आहे. 

त्यामुळे कार्तिक वद्य एकादशीची यात्रा उत्सव रद्द झाल्याने भाविकांनी श्रध्येपोटी या स्थानावर दर्शनासाठी येण्याचा प्रयत्न करु नये, घरीच सुरक्षित राहून माऊलीचा नामजप करावा, असे आवाहन गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी केले आहे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Kartik Ekadashi Yatra at Nevasa has been cancelled