मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध म्हणजे विरोधाला विरोध

मनोज जोशी
Wednesday, 7 October 2020

शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणाऱ्या मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला केवळ विरोधाला विरोध करून राजकारण केले जात आहे.

कोपरगाव (अहमदनगर) : शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडविणाऱ्या मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला केवळ विरोधाला विरोध करून राजकारण केले जात आहे. राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन या विधेयकाला पाठिंबा दिला पाहिजे. राज्य सरकारने विधेयकाला स्थगिती दिल्याने बळीराजाच्या जीवनातील हा काळा दिवस असल्याचे प्रतिपादन युवा नेते तथा कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केले. 

तालुक्‍याच्या प्रश्नावर आज पर्यंतच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन राजकारण कुठपर्यंत करावे हे दाखवून दिले आहे, आता विद्यमान लोकप्रतिनिधींनी सुद्धा परिपक्वता दाखवून केवळ पक्षश्रेष्ठींना खुश करण्यासाठी व स्वतःच्या लालदिव्याचा विचार न करता सरकारवर दबाव टाकून शेतकरी हिताची भूमिका घ्यावी अशी टीका ही कोल्हे यांनी यावेळी केली. 

हेही वाचा : राज्य सरकारविरुद्ध भाजप रस्त्यावर; केंद्र सरकारच्या कृषी विधेयकास स्थगितीचा निषेध 
कृषी विधयेकला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आयोजित आंदोलन प्रसंगी कोल्हे बोलत होते. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, पराग संधान,शहराध्यक्ष आर डी काले, सुशांत खैरे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, विजय आढाव, सरपंच विक्रम पाचोरे, बाळासाहेब पानगव्हाणे, नगरसेवक स्वप्नील निखाडे, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 

कोल्हे म्हणाले, तालुक्‍याचे नेतृत्व करताना माजी मंत्री शंकरराव कोल्हे व कुटुंबीयांनी कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही. स्वपक्षाच्या विरुद्ध आंदोलने केले, प्रसंगी पक्ष सोडले. गोदावरी, संजीवनी दूध, साखर कारखाना, कुक्कुट पालन, शेतीमालावर प्रक्रिया ,फिशरी उद्योग सुरू करून शेतकऱ्यांला त्याच्या कष्टाचे मूल्य कसे मिळेल याला प्राधान्य दिले .राज्य सरकारने हे विधेयक लागू केले नाही तर मोठे जन आंदोलन छेडण्यात येऊन सरकारला हे विधेयक स्वीकारण्यास भाग पाडू असा इशारा कोल्हे यांनी दिला.

सकल मराठा समाजासाठी आरक्षण मंजूर करावे जो पर्यंत या आरक्षणाला स्थगिती आहे तो पर्यंत राज्यात कुठलीही नौकर भरती करन्यात येऊ नये असे म्हणत कोपरगाव शहरात दर रविवारी जनता कर्फ्युचे पालन केले जात आहे मात्र दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हे नियम शिथिल करावे, अशी मागणी ही कोल्हे यांनी यावेळी केली.भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे यांनी यावेळी शासनावर टीका केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kopargaon BJP opposes the government decision