नगर जिल्ह्यातील दुर्गम भागात कनेक्‍टिव्हिटीमुळे मोबाईल खणखणू लागले

आनंद गायकवाड
Monday, 21 September 2020

सध्या मोबाईल जीवनावश्‍यक गोष्टींचा भाग झाला आहे. पावलोपावली त्याची गरज भासते.

संगमनेर (अहमदनगर) : सध्या मोबाईल जीवनावश्‍यक गोष्टींचा भाग झाला आहे. पावलोपावली त्याची गरज भासते. तांगडी, कोठे बुद्रुक (ता. संगमनेर) ही गावे अद्यापही या सेवेपासून वंचित होती. ही सेवा मिळावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बजरंग तांगडकर यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले. खासगी कंपनीच्या मोबाईल मनोऱ्यामुळे दुर्गम भागातील मोबाईल खणखणू लागले आहेत. 

मोबाईल सेवेत झालेल्या क्रांतीमुळे अनेक व्यवहार डिजिटल होत आहेत. त्यासाठी आवश्‍यक अँड्रॉइड मोबाईल खेड्यापाड्यांतील जनतेपर्यंत पोचले; मात्र पठार भागातील तांगडी, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द, वनकुटे, भोजदरी, आंबी खालसा आदी गावे भारत संचार निगमसह खासगी कंपन्यांच्या सेवेपासून कोसो दूर होती. नैसर्गिक आपत्तीसह आजारपण आदी प्रसंगात इतरांशी संपर्क साधणे जिकिरीचे ठरत होते. या पार्श्‍वभूमीवर इंटरनेटच्या मागणीसाठी येथील तरुण सरसावले. 2017पासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज त्यात यश आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kothe Budruk and Tangdi mobile towers in Sangamner taluka