esakal | क्रांतिवीर राजगुरू यांची संघर्षगाथा आता वेबसिरीजवर
sakal

बोलून बातमी शोधा

Krantiveer Rajguru's struggle story is now on the webseries

"इन्कलाब झिंदाबाद', "मेरा रंग दे बसंती चोला'चा नारा देत या भारतमातेच्या तीन सुपुत्रांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले.

क्रांतिवीर राजगुरू यांची संघर्षगाथा आता वेबसिरीजवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले "क्रांतिवीर राजगुरू' यांच्या जीवनावर आधारित "क्रांतिसूर्य हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा' ही मराठी वेबसिरीज लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. 24 ऑगस्ट रोजी क्रांतिसूर्य शिवराम हरी राजगुरू यांच्या 113व्या जयंतीचे औचित्य साधत या वेबसिरीजच्या पोस्टरचे ऑनलाइन अनावरण झाले, अशी माहिती क्रांतिवीर राजगुरू यांचे नातू सत्यशील व हर्षवर्धन राजगुरू यांनी दिली. 

भारतीय स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन महान कार्य केले त्यामध्ये "क्रांतिवीर शिवराम राजगुरू' यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या तरुण पिढीला त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात "ओटीटी प्लॅटफॉर्म'च्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

ही वेबसिरीज म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे. पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरुनगर) येथे जन्मलेला शिवराम हरी राजगुरू नावाचा मुलगा क्रांतिकारक कसा झाला, याची कहाणी या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. लेखन आशिष निनगुरकर करणार आहेत. 

या वेबसिरीजची मूळ कल्पना विलास राजगुरू यांनी आहे. अभिनेता गणेश मयेकर, अभिनेता जयराज नायर, कॅमेरामन योगेश अंधारे,अभिनेता प्रदीप कडू, कार्यकारी निर्माता प्रतिश सोनवणे, स्टील फोटोग्राफर सिद्धेश दळवी, सहाय्यक दिग्दर्शक स्वप्नील निंबाळकर, अभिनेता आनंद वाघ, अभिनेता अजित वसंत पवार, सहाय्यक निर्माते सुनील जाधव, पोस्टर डिझाइनर कल्याणी भरांबे व संकलक अभिषेक लगस,सहाय्यक दिग्दर्शक स्वरूप कासार व बालकलाकार अनुराग निनगुरकर यांची भूमिका आहे, अशी माहिती वेबसिरीजचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक सिद्धेश राजगुरू यांनी दिली. 

शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी पायाखाली अंगार असतानासुद्धा स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन उन्मत्त इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. कीर्तीसाठी किंवा घरादारात गुंतून न पडता मातृभूमीसाठी या तिघांनी आपल्या आयुष्याचे अग्निकंकण केले.

हेही वाचा - जामखेडमध्ये आहे सिद्धिविनायक

या त्रिमूर्तींनी स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान हा स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. "इन्कलाब झिंदाबाद', "मेरा रंग दे बसंती चोला'चा नारा देत या भारतमातेच्या तीन सुपुत्रांनी ब्रिटीशांच्या साम्राज्यशाही विरोधात लढा उभारला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर जाऊन हौतात्म्य पत्करले. घरादारावर तुळशीपत्र ठेऊन भारतमातेसाठी जे शहीद झाले ते अमरत्वाला प्राप्त ठरले. अशा महान तीन क्रांतिवीर देशभक्तांपैकी महाराष्ट्राची शान असणाऱ्या राजगुरू यांच्या आयुष्यावरील ही भव्यदिव्य वेबसिरीज असणार आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या, ऐन तारुण्यात हसत हसत फासावर जाणाऱ्या या क्रांतिकारकाच्या बलिदानाची कहाणी नेहमीच स्फूर्तिदायी, देशभक्तीची ऊर्जा निर्माण करणारी ही वेबसिरीज रसिकांना आवडेल, यात तिळमात्र शंका नाही. स्वातंत्र्याचे मोल अनमोल आहे. भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या क्रांतिकारांच्या बलिदानामुळे ते आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे त्याचे मोजमाप आपण शब्दांमध्ये करू शकत नाही. म्हणून या क्रांतिवीरांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच त्रिमूर्तींना खरे अभिवादन ठरेल, असा आशावाद शहीद भगतसिंह यांचे पुतणे अभेयसिंह संधू, प्रा. जगमोहनसिंह, राजगुरू यांचे पुतणे राम राजगुरू, नातू मिलिंद राजगुरू व पणतू शंतनू राजगुरू यांनी व्यक्त केला.

संपादन - अशोक निंबाळकर