करमनवाडी तलावाची दहा वर्षांनी भागली तहान, रोहित पवारांनी पाळला शब्द

नीलेश दिवटे
Saturday, 12 September 2020

निवडणुकीच्या काळात येथील शेतकरी व ग्रामस्थांनी तलावात पाणी सोडण्याची एकमताने मागणी केली होती. काहीही झाले तरी आपण तुमच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ असा शब्द त्यावेळी शेतकऱ्यांना दिला होता.

कर्जत ः तालुक्यातील करमनवाडी येथील तलावात तब्बल १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कुकडीचे पाणी आल्याने या भागातील शेतकरी सुखावले आहेत. कुकडीच्या बुजलेल्या पोटचाऱ्या, चाऱ्यांमध्ये वाढलेली झाडे-झुडुपे, अनेकांकडून या चाऱ्यांची झालेली मोडतोड यामुळे करमणवाडीच्या तलावात पाणी येणे म्हणजे मृगजळच. असे येथील शेतकऱ्यांचे मत होते. मात्र, शेतकऱ्यांचे मतपरिवर्तन करण्यात आमदार रोहित पवार यशस्वी ठरले आहेत.

निवडणुकीच्या काळात येथील शेतकरी व ग्रामस्थांनी तलावात पाणी सोडण्याची एकमताने मागणी केली होती. काहीही झाले तरी आपण तुमच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ असा शब्द त्यावेळी शेतकऱ्यांना दिला होता.

आमदार रोहित पवारांनी तो शब्द पाळला. 'हेड-टू-टेल' पाण्याचा हा प्रवास करमनवाडीपर्यंत येऊन पोहोचला आहे. कुकडी प्रकल्पापासून अगदी टोकाच्या भागात हे पाणी पोहोचले आहे. या हक्काच्या पाण्यासाठी करमनवाडी व परिसरातील लोकांना एका दशकाची प्रतीक्षा करावी लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या कुकडीच्या पाण्याच्या नियोजनामुळे 'हेड-टू-टेल' पाणी मिळण्यास प्रथमच सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - वह्या आणायला गेलेली मुलगी परतलीच नाही

कुकडीच्या प्रकल्पासाठी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या बदल्यात शेतकऱ्यांना भू-संपादनाचा मोबदलाही मिळाला नाही. पाणीही मिळाले नाही. आपल्या हक्काच्या पाण्यापासूनही शेतकऱ्यांना मुकावे लागले होते. मात्र, आता शेतकऱ्यांना भु-संपादन मोबदला मिळाला.

उर्वरित शेतकऱ्यांनाही तो मिळण्याच्या मार्गावर आहे. आमदार रोहित पवारांनी वेळोवेळी बैठका घेऊन येथील शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. कुकडीचे पाणी 'हेड-टू-टेल' पोहोचण्यासाठी प्रसंगी स्वखर्चाने नादुरुस्त चाऱ्यांची दुरुस्ती केली.

दहा वर्षांचा वनवास संपला
करमनवाडीला आमदार, अधिकारी आणि शेतकरी हा समन्वय पहिल्यांदाच अनुभवयास मिळत आहे. आमदार रोहित पवारांच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना आता विश्वासाने पाणी मिळत आहे. भूसंपादनाचा मोबदला आणि पाणी वाटपाबाबतची अनियमितता या दुहेरी संकटात शेतकऱ्यांचा मोठा काळ लोटला गेला. मात्र, आमदार पवारांच्या योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांचा 'वनवास' संपला आहे. त्यांनी दिलेला 'शब्द' पाळला. आम्ही सर्व शेतकरी ग्रामस्थ त्यांचे आभार मानतो.
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kukdi canal water in Karamanwadi lake after ten years