जागा पाटबंधारे विभागाची, कर वसुली नगर महापालिकेची

अमित आवारी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

"कुकडी'कडून वेळोवेळी पूरनियंत्रण रेषा निश्‍चित करून त्याचे नकाशे पाठविले जातात. या पूर्वीच काही बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने शहरातील पूरनियंत्रण रेषेत व काही ठिकाणी ओढे-नाल्यांमध्येच बांधकामे केली आहेत.

नगर ः शहरातील सीना नदी व नाल्यांची पूरनियंत्रण रेषा पाटबंधारे विभागाने जाहीर केली आहे. या रेषेच्या आतील जमीनही पाटबंधारे विभागाची असल्याचे कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला कळविले आहे. मात्र, या जमिनींना महापालिकेच्या नगररचना विभागाने प्लॉट व बांधकामांचे परवाने पूर्वीच दिले आहेत. त्यामुळे महापालिका या जमिनीवरील प्लॉट व बांधकामांवर कर आकारत आहे.

जमीन पाटबंधारे विभागाची; पण कर महापालिका प्रशासनाचा असा प्रकार सुरू आहे. या गोंधळाबाबत नागरिक मात्र अनभिज्ञ आहेत.  सीना नदी व तिचे ओढे-नाले हे कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात आहेत. कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सीना नदी व तिच्या ओढ्या-नाल्यांची पूरनियंत्रण रेषा निश्‍चित करून नकाशे तयार केले आहेत.

या संदर्भातील माहिती व नकाशे 30 नोव्हेंबर 2019ला महापालिकेला दिले आहेत. "कुकडी'कडून वेळोवेळी पूरनियंत्रण रेषा निश्‍चित करून त्याचे नकाशे पाठविले जातात. या पूर्वीच काही बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने शहरातील पूरनियंत्रण रेषेत व काही ठिकाणी ओढे-नाल्यांमध्येच बांधकामे केली आहेत.

हेही वाचा - आम्हाला दम देऊ नक

नदीपात्रात भराव घालून प्लॉट टाकले. ही बांधकामे व प्लॉट नागरिकांना विकले. महापालिकेची मान्यता असल्याने नागरिकांनीही हे प्लॉट खरेदी केले. शहरात अशी बांधकामे सुमारे दीड हजार आहेत.

पूरनियंत्रण रेषेच्या आत प्लॉट खरेदी अथवा बांधकाम करायचे असल्यास पाटबंधारे विभाग अटी व शर्ती घालून परवानगी देते. बांधकामे जुनी असल्यास परवानगीची गरज नाही, असा राज्य शासनाचा आदेश आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने सीना नदीपात्रालगत वृक्षलागवड व जॉगिंग पार्क करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. महासभेत सीना नदी व तिच्या मुख्य नाल्यांची पूररेषा विकास व आराखड्याचा विषय येताच ही जमीन पाटबंधारे विभागाची असल्याचे काही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा विषय बासनात गुंडाळण्यात आला.

सीना नदी व नाल्यांच्या पूरनियंत्रण रेषेतील जमीन आपली नाही, याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना कल्पना नव्हती का? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहे. 

पूरनियंत्रण रेषेत... 
सीना नदी - उगमापासून सावेडी गावठाणात येईपर्यंत विशेष अतिक्रमणे नाहीत. मात्र सावेडीत प्रवेश करताच अतिक्रमणे सुरू होतात. सुमन अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, गजराज हॉटेलपर्यंतचा परिसर, दिल्ली गेट वळील डीएड कॉलेज, नीलक्रांती चौकापर्यंत, अमरधाम, नालेगावचा काही भाग, नवीन टिळक रस्ता परिसर, हॉटेल राज पॅलेसपर्यंत, युनियन बॅंक कॉलनी व भोसले आखाड्यापर्यंत, विनायकनगर, नगर-कल्याण रस्त्यावरील काही भाग, आनंदनगर, खोकर नाला ते सीना नदी पात्र या दरम्यानचा भाग आदी. 
भिंगार नाला - सारसनगरमधील भिंगार नाल्याजवळील काही प्लॉट व बांधकामे, रामकृष्ण शाळेच्या भिंतीपर्यंत, श्रीरामनगर. 

 
पूरनियंत्रण रेषेच्या आतील जमिनी या पाटबंधारे विभागाच्या आहेत. पूर्वी या जमिनींची खरेदी अथवा त्यावर बांधकाम झाले असल्यास ते पाडणे आता शक्‍य नाही. मात्र पूरनियंत्रण लाल रेषेच्या आत नव्याने बांधकाम परवाने देण्यात येऊ नयेत. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land of Irrigation Department, Tax Recovery Municipal Corporation