लंके म्हणाले, पुढच्या वेळी तर दीड लाखाच्या लिडने येतो का नाही बघा

सनी सोनावळे
Monday, 5 October 2020

मी स्वतः गरिबीतून गेलेलो असल्याने मला सामान्यांचे प्रश्न चांगले समजतात. काही लोक जन्मला येतानाच सोन्याचा चमचा घेऊन येतात. त्यांना गरिबांचे प्रश्न कधी समजणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना मारला.

टाकळी ढोकेश्वर ः लाॅकडाऊन व कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेला वा-यावर सोडले नाही. किराणा वाटप, निवारा केंद्र, अन्नदान आणि आता कोविड सेंटरच्या माध्यमातून या राष्ट्रीय आपत्ती काळात घरात न बसता सहका-यांसोबत परिस्थितीशी दोन हात केले.

आज या कोविड सेंटरमधून तालुक्यासह जिल्ह्यातील एकुण 1 हजार 150 नागरीक उपचार घेऊन सुखरूप घरी परतले आहे, याचे समाधान वाटत असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथील आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शरदचंद्र पवार कोविड सेंटर बाबत लंके यांनी माहिती दिली.

या वेळी डाॅ.उदय बर्वे, अॅड.राहुल झावरे, दादा शिंदे, राजेंद्र चौधरी, बाळासाहेब खिलारी, अंकुश पायमोडे उपस्थित होते.
लंके म्हणाले, आपल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासोबत या आजारात महत्त्वाचा भाग असणारा मानसिक आधार दिला जात आहे.

रूग्णांना दर्जेदार असे सकस जेवण दिले जात आहे. आपल्या कोविड सेंटरसह येथील जेवणाची राज्यात चर्चा आहे. जेष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील या बाबत कौतुक केले.

ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवुन मतदान केले. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मी स्वतः गरिबीतून गेलेलो असल्याने मला सामान्यांचे प्रश्न चांगले समजतात. काही लोक जन्मला येतानाच सोन्याचा चमचा घेऊन येतात. त्यांना गरिबांचे प्रश्न कधी समजणार, असा टोलाही त्यांनी विरोधकांना मारला.

 पारनेर नगर पंचायत एकहाती ताब्यात येणार 

पुढील विधानसभा निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत जे 61 हजाराचे लीड घेतले होते, त्यापेक्षा अधिक दीड लाख फरकाने निवडुन येईल. आणि आगामी पारनेर पंचायत निवडणुकीत देखील एकहाती सत्ता मिळून शंभर टक्के ताब्यात येणार असल्याचा विश्वास आमदार लंके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lanka said, next time I will be elected with a lead of one and a half lakh