esakal | अहमदनगर : सलग चौथ्या वर्षी ‘मुळा’ काठोकाठ
sakal

बोलून बातमी शोधा

largest dam in Ahmednagar district Mula Dam is one hundred percent full

सलग चौथ्या वर्षी ‘मुळा’ काठोकाठ

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (जि. अहमदनगर) : जिल्ह्यातील सर्वांत मोठे मुळा धरण (Mula Dam) काल (रविवारी) शंभर टक्के भरले. धरण भरण्याचे यंदाचे सलग चौथे वर्ष आहे. मागील ५० वर्षांत ३२ वेळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या मुळा धरणात १९७२ मध्ये पाणी साठविण्यास सुरवात झाली. धरणास ५० वर्षे पूर्ण झाल्याने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी धरणाच्या दरवाजांवर तिरंगी प्रकाशझोत सोडला. यामुळे धरणाची शोभा वाढली.

आज ( सोमवार) सकाळी सहा वाजता धरणाच्या दरवाजांद्वारे मुळा नदीपात्रात १०८५ क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. या वर्षी धरणात २२ हजार ९७९ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. यंदा धरणाच्या दरवाजांद्वारे मुळा नदीपात्रात दोन हजार ३०८ दशलक्ष घनफूट, उजव्या कालव्याद्वारे ७४५ दशलक्ष घनफूट, तर डाव्या कालव्याद्वारे २०८ दशलक्ष घनफूट, असे तीन हजार २६१ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी सोडण्यात आले.

उजव्या कालव्याद्वारे राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर व डाव्या कालव्याद्वारे राहुरी तालुक्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होते. एकूण ८३ हजार हेक्टर क्षेत्राला पाण्याचा लाभ होतो. वांबोरी उपसा योजनेस ६८० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. त्याचा राहुरी, नगर, नेवासे, पाथर्डी तालुक्यांतील तीन हजार ५६८ हेक्टर क्षेत्राला अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होतो. प्रत्यक्षात वांबोरी योजनेद्वारे ४२ पैकी ३९ गावांमधील ७५ तलावांमध्ये पाणी पोचते. भागडा चारीद्वारे धरणातून ६० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर आहे. त्याद्वारे राहुरीतील अकरा तलावांमध्ये पाणी सोडले जाते. तीन औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, नगरपालिका व विविध गावांच्या पाणीयोजनाही याच धरणावर आहेत. यंदा धरण भरल्याने वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे.

हेही वाचा: डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष

या वर्षी १६ हजार दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे चार आवर्तने मिळण्याची शक्यता आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सिंचनाच्या पाण्याचे कसे नियोजन केले जाते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आकडे बोलतात

५० वर्षांत धरण भरले- ३२ वेळा
या वर्षी पाण्याची आवक- २२ हजार ९७९ दशलक्ष घनफूट
धरणातून सोडलेले पाणी- तीन हजार २६१ दशलक्ष घनफूट

हेही वाचा: MG Astor भारतात लाँच, किंमत Hyundai Creta पेक्षा कमी

loading image
go to top