हे तर बिनपगारी अन्‌ फुल अधिकारी ! निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मिळेना मानधन

सचिन सातपुते  
Saturday, 9 January 2021

ग्रामपंचायत निवडणूक ही अन्य निवडणुकांपेक्षा प्रशासनाच्या दृष्टीने अधिक खर्चिक असते. प्रत्येक गावात किमान तीन ते पाच प्रभाग असतात.

शेवगाव (अहमदनगर) : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून मानधनच मिळत नसल्याने, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडणारे केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना 'बिनपगारी पण फुल अधिकारी' म्हणून काम करावे लागत आहे. निवडणुकीसाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीतून प्रक्रियेचा इतर खर्चच भागत नसल्याने, प्रशासनाला ही तारेवरची कसरत करावी लागत आहे. कर्मचाऱ्यांना फुकटच राबवून घ्यावे लागते, अशीच भावना तयार होत आहे. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

ग्रामपंचायत निवडणूक ही अन्य निवडणुकांपेक्षा प्रशासनाच्या दृष्टीने अधिक खर्चिक असते. प्रत्येक गावात किमान तीन ते पाच प्रभाग असतात. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र मतदान केंद्र उभारावे लागत असल्याने, एका गावासाठीची प्रक्रिया राबविताना प्रभागनिहाय प्रत्येकी पाच, या प्रमाणात 15 ते 25 कर्मचारी नेमावे लागतात. प्रक्रिया सुरू केल्यापासून त्यासाठी लागणारी स्टेशनरी, कर्मचारी प्रशिक्षण व मानधन, वाहन व्यवस्था व अन्य खर्चासाठी ग्रामपंचायतनिहाय 49 हजार रुपये मिळतात. त्यात मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राची हाताळणी व सीलिंगच्या स्टेशनरीचा खर्च जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वजा करून, उर्वरित रक्कम तालुका प्रशासनास मिळते. त्यातून इतर खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीसाठी राबलेल्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिला जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित कर्मचाऱ्यांना विनामानधन या जबाबदारीच्या कामासाठी राबविले जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या वर्षी तालुक्‍यातील 48 ग्रामपंचायतींसाठी 52 जणांची निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यातील 22 अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी दोन, तर चार अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची प्रक्रिया देण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी 171 पथके तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी 855 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एका टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या वेळी तालुक्‍यात प्रथमच, प्राथमिक शिक्षकांनाच पदाचा व मूळ पगाराचा विचार न करता सरसकट केंद्राध्यक्ष व इतर नेमणुका देण्यात आल्याने, शिक्षकांमध्ये निवडणूक शाखेच्या कारभाराबाबत रोष आहे. विनामानधन कर्मचारी नेमताना तरी सर्व विभागांतील कर्मचारी घ्यावेत, अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. 

ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी इतर निवडणुकांच्या तुलनेत शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत असल्याने, प्रक्रिया राबविताना व त्यावर खर्च करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. 
- अर्चना भाकड, तहसीलदार, शेवगाव 
 
ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया काटेकोर पार पाडूनही, गेल्या अनेक निवडणुकांपासून शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आलेले नाही. या वर्षी सरसकट प्राथमिक शिक्षकांनाच नियुक्‍त्या दिल्याने किमान मानधन तरी देण्यात यावे. 
- बाळकृष्ण डमाळ, जिल्हा सरचिटणीस, सदिच्छा मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the last several years the employee appointed to carry out the gram panchayat election process have not received any honorarium