बिबट्याने दबा धरून तीन शेळ्या केल्या गट्टम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

तौफीक चौगुले यांची शेळकेवाडी शिवारात शेती आहे. चौगुले गुरूवारी नेहमीप्रमाणे शेताजवळच शेळ्या चारत होते.

बोटा (अहमदनगर) : परिसरातील पठारभागात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. बिबट्याने परिसरातील तीन शेळ्या फस्त केल्या. ही घटना गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुरकुंडी येथे घडली.

तौफीक चौगुले यांची शेळकेवाडी शिवारात शेती आहे. चौगुले गुरूवारी नेहमीप्रमाणे शेताजवळच शेळ्या चारत होते. त्याचवेळी तेथील झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

ते पाहून चौगुले यांनी मदतीसाठी जोरजोराने आरडाओरड केली. पण ग्रामस्थांना येईपर्यंत बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. तीनपैकी एक शेळी बिबट्याने उचलून नेली. या घटनेची माहिती चौगुले यांनी वनविभागाला दिली.

शुक्रवारी सकाळी वन विभागाचे दिलीप बहीरट, बाळासाहेब वैराळ यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला. दरम्यान, काही दिवसांपासून पठार भागातील साकूर, बिरेवाडी, शिंदोडी येथील शेळ्या, बैल, गायींवर बिबट्यांनी सतत हल्ले केले आहेत. बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard ate the farmer's three goats