अखेर शार्प शूटरचा नेम लागला, सोलापूरचा नरभक्षक बिबट्या खलास झाला, तीन जिल्ह्यांनी सुटकेचा निश्वास टाकला

वसंत सानप
Friday, 18 December 2020

सरकारने हा बिबट्या दिसेल तिथे गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता. बरेच दिवस शार्प शूटर बिबट्याच्या मागावर होते. अनेकदा त्यांचा नेमही चुकला होता.

जामखेड : नगर जिल्ह्यासह तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला आज वन विभाग आणि शार्प शूटरच्या मदतीने गोळ्या घालण्यात आल्या. आणि हा नरभक्षक बिबट्या शूट झाल्याने केवळ सोलापूरच नव्हे तर शेजारील नगर आणि बीड जिल्ह्यातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेल्या महिन्यापासून नगर, सोलापूर, बीड जिल्ह्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. विशेषतः शेतकरी वर्गाने या बिबट्याचा धसका घेतला होता. हा बिबट्या नरभक्षक झाल्याने लोकांमध्ये धास्ती होती.

सरकारने हा बिबट्या दिसेल तिथे गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता. बरेच दिवस शार्प शूटर बिबट्याच्या मागावर होते. अनेकदा त्यांचा नेमही चुकला होता.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वांगी नं.4 येथे रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला ठार मारण्यात आले.

हेही वाचा - कर्जत-जामखेडमधील पोलिसांना पवारांचे अनोखे गिफ्ट

औरंगाबाद ,अहमदनगर,बीड आणि सोलापूर जिल्ह्यात या नरभक्षक बिबट्याने 11 लोकांचा बळी घेतला होता.काल सायंकाळ पासून बिबट्याला मारण्याची प्रक्रिया सुरू होती.

काल सायंकाळी हा बिबटया बिटरगाव मध्ये आढळून आला. वन विभागाच्या सूत्रानुसार हा बिबटया उजनीच्या काठावरून परत आल्या मार्गाने निघाला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता. त्याला उजनीच्या पाण्यामुळे पुढे जाण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे तो परत मागे आल्या रस्त्याने फिरला होता.

काल सायंकाळी या भागात शेतकऱ्यांना बिबटया दिसल्यानंतर रात्रीपासून त्याला मारण्यासाठी प्रयत्न सुरू होते .सोलापूर वन विभाग आणि पुणे येथील रायफल क्लबचे चंद्रकांत मंडलिक यांच्या शार्प शूटरच्या मदतीने त्याला ठार मारण्यात आले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dies in Karmala taluka