esakal | शेवगावमध्ये बिबट्याचा दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

 Leopard terror in Shevgaon

रानावनात पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई असते. त्यामुळे जायकवाडी धरण परिसर वगळता वन्य प्राण्यांचा वावर कमी असतो. मात्र, काही वर्षांपासून तालुक्‍याच्या अनेक भागांत बिबट्या दिसत आहे.

शेवगावमध्ये बिबट्याचा दहशत

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव  : जंगलातील वावर सोडून मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याचे तालुक्‍यातील पाळीव प्राणी व माणसांवरील हल्ले काही वर्षांत वाढले आहेत. वर्षभरात तालुक्‍यात 15 ठिकाणी मानवी वस्तीवर हल्ले करीत बिबट्याने पाळीव प्राणी, माणसांना लक्ष्य बनविले. त्यातील सर्वाधिक हल्ले जायकवाडी परिसरातील बागायती उसाच्या पट्ट्यात झाले आहेत. 

तालुक्‍यातील वाघोली येथे घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षीय शंभू केसभट याच्यावर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला. त्यास ओढून नेत असताना, बहीण स्वप्नालीने त्यास स्वत:चा जीव धोक्‍यात घालून पकडून ठेवले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे.

वारंवार मानवी वस्त्यांवर बिबट्याचे हल्ले वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्‍याचा बहुतांशी भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे वर्षातील निम्म्याहून अधिक कालावधीत शेतीत पिके नसतात. असली तरी त्यांची वाढ होत नाही. शिवाय रानावनात पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई असते. त्यामुळे जायकवाडी धरण परिसर वगळता वन्य प्राण्यांचा वावर कमी असतो. मात्र, काही वर्षांपासून तालुक्‍याच्या अनेक भागांत बिबट्या दिसत आहे.

हेही वाचा ः गुणवत्ता वाढीसाठी पुस्तके घरपोहच द्या 
 

दहिगाव-ने, शहर टाकळी, भावीनिमगाव, देवटाकळी, भायगाव, मजले शहर, ढोरजळगाव, आखतवाडे, भातकुडगाव, दहिफळ, घोटण, एरंडगाव, खानापूर, कऱ्हे टाकळी व मुंगी परिसरात ऊस व फळबागांचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे बिबट्यास लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री होणारे बिबट्याचे दर्शन ही नित्याची बाब झाली आहे. 

तालुक्‍यात सर्वप्रथम 2004मध्ये ठाकूर निमगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. तेथे झालेल्या हल्ल्यात चौघे जखमी झाले. तीन वर्षांपूर्वी दहिगाव-ने येथील महिला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. त्यानंतर सातत्याने बिबट्यांची संख्या व हल्ले वाढत आहेत.

गेल्या वर्षभरात ढोरजळगाव येथील दोन शेळ्या, भावीनिमगाव येथे एक शेळी, मुंगी येथील वासरू, मजलेशहर येथील दोन शेळ्या, आखतवाडे येथील एक शेळी, वाघोली येथील तीन शेळ्या, दहिफळ येथे घोडा, अशा पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला. मात्र, माणसांवरील त्याचे हल्ले हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे शेतवस्तीवरील नागरिक भयभीत झाले आहेत. 

बिबट्याचा वावर शक्‍यतो उंच पिकांत आढळतो. शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्यास किंवा त्याचे ठसे आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा. पिंजरा लावलेल्या परिसरात रात्रीच्या वेळी शक्‍यतो गोंगाट करू नये. संयम ठेवून खबरदारी घेतल्यास बिबट्याचे मानवी वस्त्यांवरील हल्ले कमी करणे शक्‍य होईल. त्यासाठी वन विभागास सहकार्य करावे. 
- पांडुरंग वेताळ, वनपाल  

 
 

loading image
go to top