संगमनेरमधील अवैध कत्तलखाने व गोवंश हत्या बंद करण्याचे पोलिस अधीक्षकांना साकडे

आनंद गायकवाड
Tuesday, 15 December 2020

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही संगमनेर शहर व तालुक्यात राजरोस गोवंश हत्या करुन गोवंशाच्या मांसाची तस्करी सुरु आहे.

संगमनेर : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही संगमनेर शहर व तालुक्यात राजरोस गोवंश हत्या करुन गोवंशाच्या मांसाची तस्करी सुरु आहे. याबाबत पोलिसांना वारंवार माहिती देवूनही जुजबी कारवाई केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेवून कत्तलखाने बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे.

शहरातील जमजम कॉलनी, भारत नगर, रेहमत नगर, कोल्हेवाडी रोड, फादरवाडी, कुरणरोड, मोगलपुरा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने आहेत. बेकायदेशर पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कत्तल व मांसाची विक्री होते. सुमारे 200 ते 300 जनावरे ठेवता येतील अशा शेडमध्ये आधुनिक कटींग मशिनसाठी बेकायदा विज जोडणी केली जाते. तसेच नगरपरिषदेचे 2 इंच व्यासाचे अनधिकृत नळही जोडलेले आहेत. गटारातून रक्तासह मांसाचे निरुपयोगी भाग वाहत जावून प्रवरा नदीपात्रात मिसळतात. यामुळे तालुक्यातील निंबाळे, जोर्वे आदी गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा दुषित व दुर्गंधीयुक्त झाला असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संगमनेर येथून मुंबई, भिवंडी, औरंगाबाद, गुलबर्गा, हैदराबाद, बांगलादेश आदी ठिकाणी गोवंशाच्या मांसाची निर्यात होते. लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक भाजीपाल्याच्या वाहनांतून मांसाची तस्करी झाल्याची बाब नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हद्दीत झालेल्या कारवाईत उघडकीला आली आहे. मोठ्या अर्थकारणातून संगमनेर गोवंशाची कत्तल व मांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिध्द झाले आहे. येथे दररोज सुमारे 500 ते 600 गोवंशाची कत्तल होत असून, पकडलेले मांस आर्थिक तडजोडीतून कमी दाखवले जात असल्याचा, तसेच आरेपींना मैत्रीपूर्ण संबंधातून पाठिशी घातले जात असल्याचा आरोपही केला आहे.

छाप्यानंतर या कत्तलखान्याचा मूळ मालक, जनावरांचा पुरवठादार, आर्थिक पाठबळ देणारी व्यक्ती, वाहतूक व विक्री करणारी व्यक्ती यांना कायद्याच्या कक्षेत घेतले जात नसल्याने हा धंदा निर्विघ्नपणे सुरु असतो. शहरालगतच्या कुरण येथील अनेक व्यापारी गुजरातमधून आणलेल्या भाकड जनावरांचा पुरवठा या कत्तलखान्यांना करतात. कुरण येथे पोलिस पथक तसेच संगमनेरात 2017 साली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सशस्त्र जीवघेणा हल्ला झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, नेवासे, कोपरगाव, अकोले येथील बेकायदेशीर कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्याची मागणी निवेदनात केली आहे. या वेळी बजरंग दलाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक सचिन कानकाटे, कुलदिप ठाकुर, विशाल वाघचौरे, वाल्मिक धात्रक आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter to Superintendent of Police Manoj Patil of Bajrandal in Sangamner