esakal | बापरे! सोशल मीडियावर कोरोनाबाधितांच्या याद्या; रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप
sakal

बोलून बातमी शोधा

List of corona positive patients in Nagar district go viral on social media

कोरोनाबाधितांच्या नावांबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे. कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

बापरे! सोशल मीडियावर कोरोनाबाधितांच्या याद्या; रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : कोरोनाबाधितांच्या नावांबाबत प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे. कोरोनाबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाचाचणीच्या याद्याच सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, संबंधितांवर कुठलीच कारवाई केली जात नाही. याद्या व्हायरल होत असल्याने कोरोनाबाधितांसह त्यांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावर याद्या व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. हे करीत असताना, प्रशासनाकडून कोरोनाबाधितांची नावे उघड होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोनाबाधितांच्या नावांसह असलेली यादीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोना चाचणी झाल्यावर जिल्हा रुग्णालयाकडून निवडक अधिकाऱ्यांसह महापालिका व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच याद्या पाठविल्या जातात. त्यानंतर संबंधित रुग्णांना दूरध्वनी करून चाचणीचा निकाल सांगितला जातो. रुग्णालयात उपचार करण्याबाबत सूचना केल्या जातात. मात्र, या प्रक्रियेदरम्यान कोरोनाबाधितांच्या याद्या "लिक' होऊन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

हेही वाचा : कोरोनाबाबत जनजागृतीचा नवीन फंडा; नगर जिल्हा परिषदेचा कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न
त्यामुळे कोरोनाबाधितांची माहिती व्हायरल होत असून, त्याचा सर्वाधिक मनस्ताप संबंधित रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांना उपचार सोडून त्यांच्या नातेवाईकांना घरात कोण-कोण कोरोनाबाधित आहे, कोठे उपचार सुरू आहेत, याची विचारणा करण्यासाठी फोन कॉल घेत बसावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे सोशल मीडियावर याद्या व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

जिल्हा प्रशासनाकडून जाहीर होणाऱ्या आकडेवारीची माहिती अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल करीत आहेत. ही माहिती व्हायरल करताना, सोशल मीडियावरील भीतीदायक चिन्हांचा वापर करतात. त्यातून समाजात आणखी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. 

नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे म्हणाले, जिल्हा रुग्णालयाकडून कोणलाच यादी दिली जात नाही. ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, त्यांना दूरध्वनीवर कळविले जाते. त्यानंतर संबंधित रुग्णाला त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्टचा नंबर दिला जातो.

संपादन : अशोक मुरुमकर