श्रीरामपूर तालुकावार्ता : लोकविकास आघाडी दिल्लीतील आंदोलनाच्या पाठीशी

गौरव साळुंके
Monday, 7 December 2020

सुधारीत कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासह मंगळवारी (ता. ८) पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील येथील लोकसेवा विकास आघाडीने पाठींबा दिला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : सुधारीत कृषी आणि कामगार कायदे मागे घेण्यासाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासह मंगळवारी (ता. ८) पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील येथील लोकसेवा विकास आघाडीने पाठींबा दिला आहे.

यासंदर्भात आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी आणि कामगार धोरणामुळे देशभरातील लाखों शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. सुधारीत कायद्यातील तरतुदीमुळे शेतमाल विक्रीत मक्तेदारी तयार होईल. बाजार समितीनजिक खाजगी कंपन्यांना विपणनाची परवानगी दिल्यास शेतकरयांना हमीभाव मिळणार नाही. करार शेतीमुळे शेती व्यवसाय भांडवलदारांच्या हाती जाईल. 

शेतमालाला शाश्वत भाव मिळण्यास संरक्षण राहाणार नाही. तसेच साठेबाजी अनियंञित होवून शेतमालाचे भाव पाडले जाणार असल्याचा सवाल लोकसेवा विकास आघाडीने उपस्थित केला आहे. केंद्राचे धोरण शेतकरी विरोधी असून ते बदलण्याची गरज आहे. सुधारीत कृषी आणि कामगार कायदे रद्द करण्यासाठी पंजाब प्रातांतील शेतकरी गेल्या आठ दिवसांपासून दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. यासंदर्भात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा विकास आघाडीची बैठक घेवून शेतकरी आंदोलनास पाठींबा देत मंगळवारी (ता.८) पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

त्रिभुवन यांची सरचिटणीसपदी निवड
श्रीरामपूर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी राज्यभरात जेष्ठनेते शरदचंद्र पवारांचे हात बळकट करण्यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी संघटना उभारण्याचे आपले प्रयत्न आहेत. पक्ष मजबुतीसाठी युवकांनी राजकारणासह समाजहिताचे कार्य करण्याचे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले. 

तालुक्यातील माळवाडगाव येथील महेश त्रिभुवन यांची नुकतीच तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. यावेळी निवडीचे पत्र प्रदान करुन त्रिभुवन यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आदिक बोलत होते. जेष्ठनेते शरदचंद्र पवार यांच्या विचारानुसार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आजच्या युवकांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष मजबुतीसाठी भक्कम कार्य करावे. शालेय विद्यार्थ्यांना येणारया विविध शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी आपले नेहमी सहकार्य राहणार असल्याची, ग्वाही अविनाश आदिक यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, सचिन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, उत्तम आसने, श्रीकांत दळे, इम्रान शेख उपस्थित होते.

समाजरत्न आणि कोविड योद्ध पुरस्कार जाहीर
श्रीरामपूर :
महाराजा बहुउद्देशीय प्रतिष्ठाण आणि समाजसेवा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे समाजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. ३० डिसेंबरला समाजसेवक डॉ. रविंद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याची माहिती रामपाल पांडे आणि सुरज सुर्यवंशी यांनी दिली. 

पुरस्कार विरतण सोहळ्यासाठी महेश व्यास, कडूभाऊ काळे, किशोर निर्मळ, सुरेश वाबळे, बबन तागड उपस्थित राहणार आहे. यंदाच्या पुरस्कारानसाठी बारा समाजरत्न आणि चार कोविड योध्दाच्यांची निवड केली आहे. नामदेव देसाई, डॉ. वसंत जमधडे, भरतकुमार उदावंत, ज्ञानेश गवले, मंदा चव्हाण, बाळासाहेब रासकर, काकासाहेब कोयटे, अविनाश कुदळे, रभाजी वाघमारे, सुभाष वाघुंडे, निलकंठ तरकासे, विनय ढोले यांचा समावेश आहे. तसेच कोरोनाच्या संकटात समाजसेवा केलेल्या जीवन सुरूडे, प्रसन्न धुमाळ, वसुधा बुगदे, डॉ. तौफिक शेख यांचा कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lok Vikas Aghadi backs the agitation in Delhi