पांढऱ्या सोन्याच्या आगारात हंगाम पूर्ण होण्याअधीच शेतातील उभ्या पिकाचे सरपण

सचिन सातपुते
Saturday, 26 December 2020

अतिवृष्टीमुळे यंदा तालुक्यातील कपाशीच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम पूर्ण होण्याअधीच शेतातील उभ्या पिकाचे सरपण झाले आहे.

शेवगाव (अहमदनगर) : अतिवृष्टीमुळे यंदा तालुक्यातील कपाशीच्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाल्याने हंगाम पूर्ण होण्याअधीच शेतातील उभ्या पिकाचे सरपण झाले आहे.

अशा परिस्थितीत कपाशीची हंगाम पूर्व काढणी करुन इतर पिकाचा आधार शेतक-यांना घ्यावा लागत आहे. केलेला खर्च, वाया गेलेली मेहनत या तुलनेत यंदा केवळ कपाशीचे सरपणच हाती आल्याने यंदाचा हंगाम अक्षरश: वाया गेला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुका पांढ-या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. जिल्हयात काही वर्षापासून सर्वाधिक क्षेत्र कपाशीखाली असलेला शेवगाव तालुका आहे. यावर्षी 41 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. मात्र जून पासून सातत्याने पावसाने धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील बहुतांशी पिके पाण्याखाली गेली. सहा पैकी पाच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

ढगाळ हवामान, शेतात साचलेले पाणी यामुळे कपाशीच्या पिकाची वाढ खुंटली, कै-या काळया पडल्या, सडल्या, ऐन बहराच्या मोसमात पोषक वातावरण नसल्याने कपाशीवर फवारणीसाठी प्रचंड खर्च झाला. बियाणे, मशागत, खते यावरही खर्च झाला. मात्र त्याप्रमाणात कापसाचे उत्पादन झाले नाही. पावसाळ्यानंतर कपाशी वाढलेली असूनही त्याला कै-याच उरल्या नाही. त्यामुळे नुसत्या उभ्या झाडांचे करायचे काय असा प्रश्न शेतक-यांना पडला. अतिवृष्टीमुळे झाडांची वाढ होवूनही एकरी अवघे 4 ते 5 क्विंटलचे उत्पन्न हाती लागले. 

जुन मध्ये लावलेल्या कपाशीपासून मार्च एप्रिल पर्यंत पाण्याच्या उपलब्धतेनुसार उत्पन्न मिळते. यंदा मात्र पाणी उपलब्ध असूनही शेतात झाडांचे केवळ सांगडेच उभे आहेत. त्यामुळे मोठया प्रमाणावर खर्च करुनही त्या प्रमाणात फक्त सरपणच हाती आले. कपाशीच्या पिकाने यंदा शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले. सध्या कपाशीच्या पळ्हाटया काढून सरणासाठी त्या शेतातून घरी आणण्यात शेतकरी व्यस्त आहेत. काही शेतक-यांनी कपाशी काढून इतर रब्बीच्या पिकांना प्राधान्य दिले आहे. 

दरवर्षी हमखास उत्पन्न देणा-या कपाशीच्या नगदी पिकाने खुप मोठा दगा दिला आहे. अतिवृष्टीमुळे एकरी दहा ते पंधरा क्विंटलचे नुकसान झाले. खर्चाच्या तुलनेत काहीच हाती न आल्याने यंदाचा हंगाम वाया गेला आहे, असे वरखेडचे शेतकरी अशोक तेलोरे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of field cotton in Shevgaon taluka