मिरजगावात भाजपला महाविकासने दिले आव्हान, प्रचाराचा नारळ

नीलेश दिवटे
Tuesday, 12 January 2021

या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली होती, तिला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले.

कर्जत ः तालुक्‍यातील मिरजगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात आघाडीचा प्रयोग होत आहे. तेथे ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे व शिवसेना नेते अमृत लिंगडे यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने भाजपशी टक्कर दिली आहे. 

या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली होती, तिला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत या पदयात्रेचे सभेत रुपांतर झाले. या वेळी ज्येष्ठांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला.

हेही वाचा - पाथर्डीत सुनेला सासूबाईंचेच आव्हान, आमदार राजळे जाऊबाईंच्या पाठिशी

सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डॉ. आदिनाथ चेडे होते, तर जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, शिवसेना नेते व उपसरपंच अमृत लिंगडे, राष्ट्रवादी डॉक्‍टर्स सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोरडे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, प्रा. सर्जेराव बावडकर आदी उपस्थित होते. 

डॉ. चेडे म्हणाले, की गेल्या पाच वर्षात शहराचा विकास खुंटला. दैनंदिन गरजांसाठी त्यांनी शहराला वेठीस धरले. त्या विरोधकांना मिरजगावकर या निवडणुकीत धडा शिकविल्या शिवाय राहणार नाहीत. 

गुलाब तनपुरे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत शहराचे वाळवंट झाले आहे. गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही समविचारी एकत्र आलो आहोत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली असून, आगामी काळात ती केली जातील. 

अमृत लिंगडे, डॉ. चंद्रकांत कोरडे, डॉ. पंढरीनाथ गोरे, शिवाजी नवले, सर्जेराव बावडकर, प्रशांत बुद्धिवंत यांची या वेळी भाषण झाले.

या प्रचारसभेत वक्‍त्यांनी डॉ. आदिनाथ चेडे, गुलाब तनपुरे, अमृत लिंगडे, डॉ. चंद्रकांत कोरडे व डॉ. पंढरीनाथ गोरे हे पाच पांडव एकत्र आले असून, ते समोरील भ्रष्टाचारी कौरवांचा मतदारांच्या आशीर्वादाने पराभव करीत, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी जोरदार दाद दिली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas challenges BJP in Mirajgaon