श्रीगोंद्यात जमिनीत गाढलेला माणूस निघाला पुण्याचा, बारामतीतून दोघे ताब्यात

संजय आ. काटे
Friday, 12 February 2021

मृताच्या गळ्यातील एक चेन मात्र तशीच असल्याने, नेमक्‍या प्रकाराबाबत पोलिसांनी बारकाईने माहिती जमा केली.

श्रीगोंदे : पोलिसांनी ठरवलं तर ते सुतावरूनही स्वर्ग गाठू शकतात. दोन दिवसांपूर्वी एका माणसाला जमिनीत गाढले होते. त्याचे धडही गायब झाले होते. त्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते.

तालुक्‍यातील टाकळी कडेवळीतच्या माळरानावर सोमवारी (ता. 8) काही कुत्र्यांनी मृतदेह उकरून काढला होता. श्रीगोंदे पोलिसांनी शर्टच्या कॉलरवरील निशाणीवरून शोध घेत मृत रमेश जाधव (वय 59, रा. कात्रज, पुणे) यांच्या घरापर्यंत माग काढला. याप्रकरणी पोलिसांनी बारामती येथील दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असलेला माळरानावर कुत्र्यांनी उकरलेल्या मृतदेहाबाबतची माहिती ग्रामस्थांनी श्रीगोंदे पोलिसांना दिली होती. त्याचे शिर गायब असल्याने, खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला गेल्याचा अंदाज होता. 

हेही वाचा - महाविकास आघाडीने बाजी पलटवली, भाजपचे सत्तेचे विरले

मृताच्या गळ्यातील एक चेन मात्र तशीच असल्याने, नेमक्‍या प्रकाराबाबत पोलिसांनी बारकाईने माहिती जमा केली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृताच्या अंगातील शर्टवर असलेल्या निशाणीवरून पुण्यातील टेलर शोधला आणि त्यानंतर मृत रमेश जाधव यांच्या घरापर्यंत पोचले.

रमेश जाधव जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यातूनच त्यांचा खून झाला असण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला असून, बारामती येथून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समजली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The man buried in the ground at Shrigonda is from Pune