कळसूबाई शिखराच्या पायथ्याला भरतो अंधश्रद्धेचा बाजार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

मागील दोन वर्षांपासून नाशिक, ठाणे, शहापूर, घोटी, मुंडेगाव, पाडली, आंबेवाडी येथील लोक कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पत्र्याच्या शेडमध्ये जमा होतात.

अकोले : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी घनगर्द जंगलात, निर्जन ठिकाणी काल (रविवारी) शेतातून जोरजोरात आवाज येऊ लागला. ती माहिती मिळताच आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते तेथे गेले तेव्हा अंधश्रद्धेचा बाजार भरल्याचे दिसून आले.

काही महिलांच्या अंगात आल्याने घुमत होत्या. अंधश्रद्धेचा हा प्रकार बंद करा, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. मात्र, तेथील लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी मोठा गोंधळ घातल्याने आदिवासी विकास परिषदेचे कार्यकर्ते निघून गेले. 

हेही वाचा - मोबाईलमधील अॅपने केला पुण्याच्या तरूणांचा घात

मागील दोन वर्षांपासून नाशिक, ठाणे, शहापूर, घोटी, मुंडेगाव, पाडली, आंबेवाडी येथील लोक कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पत्र्याच्या शेडमध्ये जमा होतात. रविवारी (ता. 10) तेथून मोठा आवाज येऊ लागल्याने बारीचे सरपंच तुकाराम खाडे, भरत घाणे, सचिन पवार, पांडुरंग खाडे, विजय भांगरे, शंकर घारे, बाळासाहेब साबळे आदींनी घटनास्थळी भेट दिली.

तेथे एका हॉलमध्ये काही महिलांच्या अंगात आले होते. अंधश्रद्धेचा हा प्रकार बंद करा, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले; मात्र उपस्थित मंडळी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच माघार घेतली.

या बाबत सरपंच खाडे म्हणाले, ""ग्रामपंचायतीची परवानगी न घेता, अवैधरीत्या बांधलेल्या शेडमध्ये बाहेरगावचे लोक गोंधळ घालतात. हे योग्य नाही. लवकरच ग्रामसभा घेऊन हा प्रकार शासनदरबारी मांडू. यापुढे बाहेरील लोकांनी येथे येऊ नये.'' 

संपादन -अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market of superstition fills the foothills of Kalsubai peak