सकाळी सातला विवाह अन्‌ नऊला नवरी सासरी 

Marriage at seven in the morning
Marriage at seven in the morning

श्रीगोंदे : बॅंडबाजा तर लांबच, मामा यायचीसुद्धा वाट पाहिली नाही. सकाळी सात वाजता भटजींनी शुभमंगल सुरू केले आणि दोन तासांत तर नवरी नवरदेवासोबत सासरी. नात्यातच झालेल्या या विवाहाला केवळ आठ ते नऊ जण उपस्थित आणि सगळ्यांनाच घाई होती, लवकर उरका आणि निघा म्हणण्याची... 

कोरोनाला अजिबात न घाबरता मोकाट फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असली, तरी कोरोनासोबतच प्रशासनाच्या भीतीने अनेकांनी घरात बसणे पसंत केले आहे. सध्या लग्नसराईदेखील सुरू असून, ठरलेल्या विवाहांचे काय करायचे, असा मोठा प्रश्न वधू व वराच्या घरच्यांना पडला आहे. मात्र, काही लोकांनी यात मध्यममार्ग काढत शेजारच्यांनाही नवी नवरी घरी आल्यावरच "दोनाचे चार हात झाले' हे समजते. 
रुसवा-फुगवा आणि मान-पान दूरच; आता होणारे लग्न किती घाईत सुरू आहे, याचे उदाहरण आज तालुक्‍यात पाहायला मिळाले. नगर-दौंड महामार्गालगत असणाऱ्या एका बागायती गावात भल्या सकाळी विवाह पार पडला. 25 किलोमीटर अंतरावरून नवरदेवाचे आगमन पहाटेच झाले. कोण आले, कोण राहिले याची अजिबात चर्चा न करता हळदीचा कार्यक्रम उरकला. सकाळी सात वाजता भटजींनी पहिले मंगलाष्टक म्हणायला सुरवात केली आणि नवरीचा मामा धावतच आला. "मी येईपर्यंत तरी थांबायचे होते' असा नाराजीचा सूर लावण्यापूर्वीच दोन्हीकडच्या मंडळींनी "नवरीच्या पाठीशी उभा राहा' असा इशारा केला. शुभमंगल सावधान झाले... 

नवरदेवाच्या गावात शेजाऱ्यांचीही "आज विवाह आहे' ही चर्चा सुरू होण्यापूर्वीच नवरीला घेऊन मोटार घरापुढे थांबली. आता अशीच लग्ने व्हावीत, असे आशीर्वाद देत ज्येष्ठ मंडळींनी "चहा तरी पाजा' असा हट्ट मात्र धरला. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com