हरेगावात मतमाऊलीची यात्रा साधेपणाने साजरी

गौरव साळुंके
Sunday, 13 September 2020

यात्रा उत्सवानिमित्त चर्च परिसरासह डोंगरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच वेदीवर आकर्षक सजावट केली होती. हरेगाव परिसरातील रस्त्यावर बॅरिग्रेड लावुन भाविकांना दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आली होती.

श्रीरामपूर ः हरेगाव येथील मतमाऊली भक्तिस्थान लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. सध्या कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले आहेत.अनेकांवर बेरोजगारीची वेळ ओढावली. संकटातुन बाहेर काढण्यासाठी देव मदत करतो. परमेश्वराने कित्येकांना संकटातून बाहेर काढले आहे.

मतमाऊली प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्यासाठी आत्मा परमेश्वराशी एकरूप झाला पाहिजे. संकटातून मार्ग शोधण्यासाठी मारिया मातेप्रमाणे नम्रता पाहिजे, असे आवाहन नाशिक धर्मप्रांताचे महागुरु स्वामी डॉ. लूरडस डानियल यांनी केले. 

हेही वाचा - मंत्री थोरात म्हणाले आता कोरोनाचा तिसरा प्रहर

हरेगाव येथील मतमाऊली यात्रा उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. जगभरातील नागरीकांसाठी शांती, प्रेम आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करुन मतमाउली जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

दरवर्षी लाखों भाविकांच्या उपस्थित मतमाऊलीचा यात्रा उत्सव सोहळा साजरा होतो. परंतु यंदा कोरोनामुळे प्रशासकीय नियमांचे पालन करुन साधेपणात पार पडला. नोव्हेनानिमित्त धर्मगुरुंनी पवित्र मारियाच्या जीवनावर प्रवचन केले.

भाविकांनी आपआपल्या घरी राहून आॅनलाईन प्रवचनाचा लाभ घेतला. पायस रॉड्रीक्स, डॉमनिक रोझारिओ यांनी विधिवत पूजा करून मतमाउलीच्या माथ्यावर चांदीचा मुकुट चढवून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर नाशिक धर्मप्रांताचे महागुरु स्वामी डॉ. लूरडस डानियल यांचे मिस्सा बलिदान व पवित्र मरिया जीवनावर प्रवचन पार पडले.

यात्रा उत्सवानिमित्त चर्च परिसरासह डोंगरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. तसेच वेदीवर आकर्षक सजावट केली होती. हरेगाव परिसरातील रस्त्यावर बॅरिग्रेड लावुन भाविकांना दर्शनासाठी येण्यास मनाई करण्यात आली होती. चर्च परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. यात्रा उत्सवासाठी प्रमुख धर्मगुरू पायस यांनी परिश्रम घेतले. आज सकाळी वसंत सोज्वळ यांचा पवित्र मिस्सा बलिदान सोहळ्यानंतर सोहळ्याची सांगता झाली.
 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matmauli Yatra in Haregaon is simply celebrated