प्राथमिक शिक्षक ते अप्पर पोलिस अधिक्षक; डॉ. दत्ताराम राठोड यांच्याकडून आठवणींना उजाळा

सतीश वैजापूरकर
Tuesday, 6 October 2020

हिंगेवाड्यातील छोटी खोली, पांडूरंगाच्या मंदिरात एकांतात केलेला स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. त्यातून प्राथमिक शिक्षक ते अप्पर पोलिस अधिक्षक.

राहाता (अहमदनगर) : शहरातील हिंगेवाड्यातील छोटी खोली, पांडूरंगाच्या मंदिरात एकांतात केलेला स्पर्धा परिक्षांचा अभ्यास. त्यातून प्राथमिक शिक्षक ते अप्पर पोलिस अधिक्षक. अशी घेतलेली प्रगतीची झेप. येथील नऊ वर्षाच्या वास्तव्यातील जुन्या आठवणींना अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी उजाळा दिला. त्यांचे मित्र असलेले प्राथमिक शिक्षक संजय वाघमारे यांच्या घरी त्यांनी आपल्या मित्रमंडळीं समावेत गप्पांची झकास मैफील जमवीली.

तेव्हाचे त्यांचे सहकारी शिक्षक सुनील गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, अशोक गुरव, राजेंद्र वाघमारे, वृ्त्तपत्र विक्रेते रामकृष्ण लोंढे, पत्रकार दिलीप खरात, बाळासाहेब सोनावणे, छायाचित्रकार संदिप वाव्हळ, मुश्ताक शहा आदि या गप्पांच्या मैफीलीत सहभागी झाले. 

हेही वाचा : शेतमजूर संघटनेकडून श्रीरामपूर तालुक्यात गरजुंसाठी सायकलचे वाटप
शिर्डी येथील प्राथमिक शाळेत ते शिक्षक म्हणून रूजू झाले. या नऊ वर्षाच्या काळात ते सुरवातीला शहरातील हिंगे वाड्यातील खोलीत वास्तव्याला होते. याच काळात त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करायला सुरवात केली. त्यासाठी ते शहराच्या पश्चिमेला असलेल्या कातनाल्याच्या कडेच्या पांडूरंग मंदिरात सलग सात ते आठ तासांची बैठक मारीत. घरातही अभ्यासासाठी त्यांचा दिवस पहाटे चार ला सुरू होई. या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळाले. 2005 मध्ये ते पोलिस निरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झाले. नाशिक येथील पोलिस प्रशिक्षक केंद्रात रूजू झाले. नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या प्रगतीचा मुहूर्तमेढ राहाता शहरात रोवली गेली. त्यामुळे त्यांच्या मनात येथील मित्रमंडळी बाबत कायम ममत्व राहीले. याच काळात ते विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदाच्या परिक्षा देखील उत्तीर्ण झाले. यशाची ही प्रत्येक पायरी चढताना ते साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत आले. त्यानंतर आपले मित्र संजय वाघमारे यांच्या घरी येऊन मित्रमंडळी सोबत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. 

डॉ. दत्ताराम राठोड (अप्पर पोलिस अधिक्षक) : प्राथमिक शिक्षक ते अप्पर पोलिस अधिक्षक ही माझ्या आयुष्याला वेगळे वळण देणारी वाटचाल राहाता शहरातून झाली. विवीध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास मी येथील एकांतात असलेल्या पांडूरंगाच्या मंदिरात केला. माझा येथील नऊ वर्षाचा कार्यकाळ आयुष्यभर न विसरता येणारा आहे. मला प्रोत्साहन देणाऱ्या मित्रमंडळींचा मी कायम ऋणी राहील.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memories of Additional Superintendent of Police Dattaram Rathore