इथे पाण्यापेक्षाही दूध मिळते स्वस्त...दारूला आहे सोन्याचा भाव

मार्तंड बुचुडे
गुरुवार, 2 जुलै 2020

पारनेरसह बहुतांशी सर्वच तालुक्यांत दूध हे पाणीबाटलीपेक्षाही स्वस्त विकले जात आहे. पाण्याच्या एका बाटलीची किंमत किमान वीस रूपये ते २५ रूपये आहे.  

पारनेर ः कोरोनाने देशात जीवनावश्यक वस्तू स्वस्त तर भलत्याच वस्तू महाग झाल्या आहेत. शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगला बाजारभाव नाही. त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारचे विनोद फिरत आहेत. लॉकडाउनच्या काळात दारू ५० रूपयांवरून पाचशे, तंबाखू पुडी १० रूपयांवरून सत्तररूपयांपर्यंत गेली. आणि दुध, फळे मातीमोल झाले.

पारनेरसह बहुतांशी सर्वच तालुक्यांत दूध हे पाणीबाटलीपेक्षाही स्वस्त विकले जात आहे. पाण्याच्या एका बाटलीची किंमत किमान वीस रूपये ते २५ रूपये आहे.  

शेतीमालाला बाजारभाव तर नाहीच; त्यातही दुधाचे दरही थेट 20 रुपयांवर आल्याने दूधउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. सरकारी दूधखरेदीचा दर 25 रुपये असूनही, अनेक दूधसंकलन केंद्रांवर 20 रुपयेच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पशुखाद्याचेही पैसे पडत नाहीत. परिणामी, दूधव्यवसाय अडचणीत सापडला आहे. 

हेही वाचा - गंगी-भागीची यारी...

नगर जिल्ह्यात दैनंदिन सुमारे 25 लाख लिटर दूधसंकलन होते. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा शेतीबरोबरच दूधव्यवसाय हा जोडधंदा आहे. काही शेतकरी व व्यावसायिकही स्वतंत्रपणे हा व्यवसाय करतात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दुधाचे दर कमी झाले आहेत. त्यातही देशात व राज्यातही कोरोनाने कहर केल्याने शेतमालाबरोबरच दूधव्यवसायही अडचणीत सापडला आहे. मुळातच सरकारने दुधाचा खरेदी दर थेट 25 रुपये केल्याने दूधव्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्याचबरोबर, कोरोना संकटामुळे दुधाच्या खपावरही मोठा परिणाम झाला आहे.

राज्यातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. अनेक ठिकाणी दूध पाठविणे कठीण होत आहे. त्यामुळे दूधसंकलन करणारेही अडचणीत सापडल्याने त्यांनी दूधखरेदीचे दर कमी केले आहेत. त्यामुळे सध्या अनेक दूधसंकलन केंद्रांवर 20 रुपये लिटर दराने दूधखरेदी केली जात आहे. 

पशुखाद्यही महागले 
सध्या पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 50 किलो पोत्यासाठी शेंगदाणे पेंड 2230 रुपये, भुसा एक हजार रुपये, पशुखाद्य 1180 रुपये आणि उसाचे वाढे 2900 रुपये टन असे भाव झाले आहेत. हे सर्व पशुखाद्याचे दर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत; मात्र दुधाचा दर कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

दूधपावडरही झाली आयात 
देशात दोन लाख टन दूधपावडर शिल्लक असताना आता परदेशातून 10 हजार टन दूधपावडर आयात करण्यात आली आहे. त्याचाही फटका आता, पावडर तयार केली जात असलेल्या दूधसंकलन केंद्रांना बसणार आहे. तसेच, यामुळे दुधाच्या पावडरचे दर आणखी कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. 

 

शेतकऱ्यांचा तोटा सात रुपये 
शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचा दूधउत्पादनात लिटरमागे सुमारे पाच ते सात रुपये तोटा होत आहे. त्यामुळे सरकारने दुधाचा दर किमान 30 रुपये करावा किंवा लिटरमागे किमान पाच रुपये अनुदान दूधउत्पादकांना द्यावे. 
- राहुल शिंदे, अध्यक्ष, पारनेर तालुका दूध संघ 

 

25 रुपये दर बंधनकारक 
सरकारी दूधखरेदीचा दर लिटरला 25 रुपये आहे. जिल्ह्यातील दूधसंकलन केंद्रांना हा दर देणे बंधनकारक आहे. केंद्रसंचालकांनी त्यापेक्षा कमी दर देऊ नये. आता अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करावी. 
- योगेश नागरे, डेअरी विकास अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk became cheaper than water