नगरसाठी २७ हजार मेट्रीक टन युरियाची गरज, मिळाला आठ हजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री शंकरराव गडाख यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट

नगरसाठी २७ हजार मेट्रीक टन युरियाची गरज, मिळाला आठ हजार

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : या वर्षी पाऊस भरपूर होण्याचा अंदाज असल्याने, नेवासे तालुक्‍यासह नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप लागवड होणार आहे. त्यामुळे पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खताची मागणी येण्याची शक्‍यता लक्षात घेता, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी नुकतीच कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. नेवासे तालुक्‍यासह नगर जिल्ह्याला युरिया खताचा पुरवठा समप्रमाणात व वेळेवर करावा, याबाबत चर्चा करून निवेदन दिले. (Minister Gadakh meets Agriculture Minister for Urea in Nagar district)

निवेदनात म्हटले आहे, की सध्या नगर जिल्ह्यासाठी 81 हजार 910 टन युरिया खत मंजूर आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी मे महिन्याअखेर 26 हजार 820 टन युरियाचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. मात्र, आजपर्यंत आठ हजार 949 टन पुरवठा झाला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे या वर्षी नियमित खताचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्याला युरियाचा तुटवडा भासत आहे.

हेही वाचा: गांधींची टिळकांसाठी सभा, महिलेने दिली हातातील सोन्याची पाटली

नगर जिल्ह्यासह नेवासे तालुक्‍याला खरिपापूर्वी आवश्‍यक युरिया खताचा तातडीने पुरवठा करावा व जिल्ह्याची गरज ओळखून युरियाच्या बफर साठ्याचे नियोजन करून, मे महिन्यापर्यंतचा राहिलेला 17 हजार 871 टन खताचा कोटा तातडीने पाठवावा.

या मागणीनुसार कृषिमंत्री भुसे यांनी संबंधित विभागास तातडीने सूचना देऊन, जिल्ह्यासह नेवासे तालुक्‍याचा युरिया खताचा साठा खरीप पेरणीपूर्वी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या व यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, मंत्री गडाख यांच्या प्रयत्नांमुळे नेवासे तालुक्‍यासह नगर जिल्ह्याला खरीप हंगामासाठी युरिया खत उपलब्ध होणार असल्याने, जिल्ह्यातील खरिपाच्या पिकास लाभ होणार आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय नको

केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जुन्या दराचे खत काही दुकानांत पडून आहे. ते शेतकऱ्यांना त्याच दराने मिळाले पाहिजे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. जादा दराने खतांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गडाख यांनी कृषिमंत्र्यांकडे केली.(Minister Gadakh meets Agriculture Minister for Urea in Nagar district)

loading image
go to top