नगर-कोपरगाव रस्त्यासाठी आमदार काळेंचे गडकरींना साकडे

मनोज जोशी
Thursday, 3 December 2020

नव्याने घोषीत झालेला व याच रस्त्याचा एक भाग असलेल्या सावळीविहीर ते सेंधवा, या मार्गाला "एनएच 752-जी' हा क्रमांक दिला. मात्र, त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नाही.

कोपरगाव ः नगर-कोपरगाव हा संपूर्ण राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे त्वरित हस्तांतरीत करावा, तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील पूल व रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. 

दिल्ली येथे मंत्री गडकरी यांची भेट घेऊन काळे यांनी त्यांना निवेदन देण्यात आले. या भेटीबाबत काळे म्हणाले, की नगर-कोपरगाव राज्यमार्ग खिळखिळा झाला आहे. उत्तर व दक्षिण भारताला जोडणाऱ्या रस्त्याच्या समस्येकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधले.

नव्याने घोषीत झालेला व याच रस्त्याचा एक भाग असलेल्या सावळीविहीर ते सेंधवा, या मार्गाला "एनएच 752-जी' हा क्रमांक दिला. मात्र, त्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नाही. संपूर्ण नगर-कोपरगाव रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत करून त्वरित त्याचे काम सुरू करावे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी देण्याची मागणी केली. 

सिन्नर, शिर्डी, नगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटकमधील शिकोडीपर्यंत (राष्ट्रीय महामार्ग) एनएच 160 मंजूर झाला आहे. त्यामुळे सावळीविहीर फाटा ते सेंधवा (मध्य प्रदेश)पर्यंत रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) एनएच 752-जी असा क्रमांक देण्याची घोषणा केलेली आहे.

(राष्ट्रीय महामार्ग) एनएच 160साठी निधीची तरतूद केली आहे. मात्र, (राष्ट्रीय महामार्ग) एनएच 752चे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे या मार्गासाठी निधीची तरतूद झालेली नाही. गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे कोपरगाव मतदारसंघातील अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली. पूल धोकादायक झाले असल्याकडे मंत्री गडकरी यांचे लक्ष वेधल्याचे काळे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Kale's demand to Gadkari for Nagar-Kopargaon road