esakal | कामे होत नसतील तर घरी निघून जा - आमदार मोनिका राजळे
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Monica Rajale

कामे होत नसतील तर घरी निघून जा - आमदार मोनिका राजळे

sakal_logo
By
टिम ई सकाळ

पाथर्डी (जि. अहमदनगर) : ‘‘तालुक्यातील वन विभाग, भूमिअभिलेख कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा व संजय गांधी निराधार योजनेची शाखा येथे नागरिकांची अडवणूक होऊन कामे होत नाहीत. नगरपालिकेतही मुख्याधिकारी कार्यालयीन कामात हलगर्जीपणा करतात. या सर्वच गोष्टींचा आढावा घेऊन, कामात कुचराई करणाऱ्यांना यापुढे माफी नाही. कामे होत नसतील तर घरी निघून जा,’’ असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. (MLA Monica Rajale slammed the officials in the review meeting)


येथील तहसील कार्यालयात आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, राहुल राजळे, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, गटविकास अधिकारी शीतल खिंडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, सोमनाथ खेडकर, मंगल कोकाटे, अनिल बोरुडे, संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे आदी उपस्थित होते.


‘‘सरकारी कार्यालयांत नागरिकांची अडवणूक होते. शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळणे, उत्पन्नाचा दाखला मिळणे, रस्त्याचे प्रश्‍न लवकर निकाली न काढणे, अशी परिस्थिती तहसील कार्यालयाची आहे. यापुढे हे चालणार नाही. कामात सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जायला तयार रहा,’’ असा इशारा राजळे यांनी दिला.


भूमिअभिलेखमध्ये नागरिकांची सर्वाधिक अडवणूक होते. आर्थिक देवाण-घेवाणीशिवाय तेथे कोणतेही काम होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी राजळे यांच्या समोर मांडल्या. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागातही अधिकारी काम करीत नाहीत. नगरपालिकेत तर कागद हलतच नाही. विकासकामांवर याचा वाईट परिणाम होतो. नागरिकांच्या रोषाला पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते, अशा तक्रारी आहेत. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना तर ‘काम होत नसेल तर तसे लेखी द्या व निघून जा,’ असे राजळे यांनी सांगितले.


पंचायत समितीच्या घरकुल योजनेच्या यादीत सधन व्यक्तींची नावे आली आणि गरिबांची नावे गायब झाली. याचा शोध घ्या आणि गरिबांना न्याय कसा देता येईल, यासाठी गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांनी चौकशी करावी, अशी सूचना राजळेंनी केली. तनपूरवाडी ते डाकळी फाटा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश त्यांनी दिले.

हेही वाचा: 'मी ईडीचा प्रवक्ता नाही', फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया


नागरिकांनी पदे चाटून खायची का?

नागरिकांची कामे होणार नसतील पदे काय चाटून खायची का? अधिकारी व कर्मचारी यांना ही शेवटची सूचना. यापुढे कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळले तर गय केली जाणार नाही. ज्यांना कामे करायची नसतील त्यांनी घरी जावे. मला वाईट निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी दिला.

(MLA Monica Rajale slammed the officials in the review meeting)

हेही वाचा: साईसंस्थान विश्‍वस्त निवडीला 2 आठवड्यांची प्रतीक्षा

loading image