यापुढे माझा सत्कार नको, शालेय साहित्य देण्याचे आमदार लंके यांचे आवाहन 

मार्तंड बुचुडे
Tuesday, 1 December 2020

माझ्या मतदारसंघातील अनेकांचे शिक्षण केवळ शालेय साहित्य व पैसे नसल्याने थांबले.

पारनेर (अहमदनगर) : माझ्या मतदारसंघातील अनेकांचे शिक्षण केवळ शालेय साहित्य व पैसे नसल्याने थांबले. अनेकांना अत्यावश्‍यक वस्तूही मिळत नाहीत. अशा वेळी मी जनतेचे सत्कार स्वीकारणे योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात मी कुणाचाही सत्कार स्वीकारणार नाही.

ज्यांना माझा सत्कार करावा वाटतो, त्यांनी त्याऐवजी शालेय मुलांना उपयोगी पडतील, असे शैक्षणिक साहित्य, तसेच गोरगरीबांना उपयोग पडतील अशा वस्तू भेट म्हणून द्याव्यात. आपण ते साहित्य गरजू लाभार्थींना देऊ, अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

पत्रकारांशी बोलताना लंके म्हणाले, ""मतदारसंघातील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे. मात्र, पैशांअभावी ही मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार स्वीकारण्यास माझे मन तयार नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये. तशी कोणाची इच्छा असल्यास गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करावी. माझ्या सत्कारावरील शाल, हार किंवा पुष्पगुच्छ, यांवर कोणीही खर्च करू नये. यापुढे मीही असे सत्कार स्वीकारणार नाही, असा निश्‍चय केला आहे. त्याऐवजी होतकरू विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य देऊन त्यांना शिक्षणासाठी मदत करावी.'' 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
गरजूंना मदत, हाच माझा सत्कार 

ज्येष्ठांसाठी, समाजातील निराधार, गरजू लोकांसाठी जीवनावश्‍यक वस्तू द्याव्यात. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलो, तरी तुम्ही व मी समाजाचे काही तरी देणे लागतो, हा विचार मनात असला पाहिजे. त्यामुळे माझा सत्कार करण्याऐवजी गरजूंना मदत करा. माझ्यासाठी हार-तुरे, भेटवस्तू आणू नका. गरजूंची मदत, हाच माझा सत्कार समजावा, असे आवाहन लंके यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Nilesh Lanka appealed for school materials