esakal | आमदार रोहित पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील दौरा रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar visit to Solapur district canceled

एकीकडे राज्य थंडीने गारटलेले असताना दुसरीकडे मात्र, पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापले आहे.

आमदार रोहित पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील दौरा रद्द

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : एकीकडे राज्य थंडीने गारटलेले असताना दुसरीकडे मात्र, पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण तापले आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना (महाविकास आघाडी) अशी लढत होत आहे. प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार विजयी व्हावा म्हणून प्रचारसभांचा तडाखा सध्या सुरु आहे.

यातूनच पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रादीचे युवा नेते व कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, आज दुपारपासून त्यांनी अचानक दौरा रद्द केला आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आमदार रोहित पवार गुरुवार व शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांनी मोहोळ येथील बैठक संपल्यानंतर दौरा रद्द केला आहे. ट्विट करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांना आज रुग्णालयात दाखल केल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला असल्याची चर्चा आहे.

पुणे विभागात महाविकास आघाडीकडून अरुण लाड हे पदवीधर व जयंत आसगावकर हे शिक्षक उमेदवार आहेत. यांच्या प्रचारासाठी आमदार पवार यांनी गुरुवारी (ता. २६) करमाळा, टेंभुर्णी, बार्शी, दक्षिण व उत्तर सोलापूर व अक्कलकोट येथे दौरा केला. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी सकाळी मोहोळ येथे बैठक घेतली. त्यानंतर ते पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला व माळशिरस येथे जाणार होते. मात्र, मोहोळ येथील बैठक झाल्यानंतर त्यांनी पुढील दौरा रद्द केला आहे.


याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, सोलापुरातील मोहोळमधील बैठकीनंतरचा दौरा स्थगित केला आहे. शिक्षक व पदवीधरच्या पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कालपासून सोलापूर दौऱ्यावर आहे. पण आज मोहोळ इथल्या बैठकीनंतर काही अपरिहार्य कारणामुळे पुढील कार्यक्रम स्थगित करावे लागत आहेत. याबाबत आपण समजून घ्याल, ही अपेक्षा. गैरसोयीबद्दल दिलगीर आहे!

loading image