मनसेचे शिर्डीत मंदिरासाठी आंदोलन, नांदगावकरांनीही घातला दंडवत

सतीश वैजापूरकर
Sunday, 13 September 2020

राज्य सरकार हॉटेल, मॉल, विविध आस्थापना, सार्वजनिक स्थळे सुरू करू शकते; मग मंदिरे का नाही, असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला.

शिर्डी : देशातील पद्मनाभ, तिरुपती व वैष्णोदेवी मंदिरे खुली झाली असताना, राज्यातील मंदिरे कुलूपबंद आहेत. मंदिरे उघडल्याने राज्याच्या तिजोरीलाच फायदा होणार आहे.

मंदिरांवर अनेक उद्योगधंदे, रोजगार अवलंबून आहेत. भक्त आणि देव यांच्यातील ताटातूट संपविण्यासाठी सर्व मंदिरे उघडण्याबाबत साईबाबा राज्य सरकारला सुबुद्धी देवोत, अशी प्रार्थना करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज साष्टांग दंडवत घालून आंदोलन केले.

राज्य सरकार हॉटेल, मॉल, विविध आस्थापना, सार्वजनिक स्थळे सुरू करू शकते; मग मंदिरे का नाही, असा सवालही त्यांनी केला. 

श्री साईबाबांचे मंदिर खुले करावे व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन करण्यात आले. नगर-मनमाड रस्त्यावर घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसेचे उत्तर जिल्हाप्रमुख नगरसेवक दत्तात्रेय कोते यांनी सांगितले.

हेही वाचा - मंत्री म्हणतात, आता कोरोनाचा तिसरा प्रहर

मनसेचे अनिल चितळे, विजय मोगले, नगरसेवक दत्तात्रेय कोते, गणेश जाधव, कर्मचारी संघटनेचे नेते राजेंद्र जगताप, प्रताप कोते, अनिल कोते, बापू कोते उपस्थित होते. 

नांदगावकर म्हणाले, ""मंदिरांवर परिसरातील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक, हॉटेले अवलंबून आहेत. रोजगाराचा प्रश्न सध्या गंभीर आहे. मंदिर प्रशासन याबाबत सकारात्मक असून, राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे. सरकारनेही सहानुभूती व भावनात्मक दृष्टीने विचार करून तातडीने निर्णय घेत मंदिरे खुली करावीत.'' 

कार्यकारी अधिकारी बगाटे यांनी कर्मचाऱ्याच्या सर्व मागण्या मार्गी लावू, तसेच साईमंदिर उघडल्यास तासाभरात 400 भाविक दर्शन घेतील अशी व्यवस्था संस्थानने केल्याचे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS agitation in Shirdi to open temple