त्यांना द्यायचा होता नरबळी..? यांनीही केली होती मॉब लिचिंगची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मे 2020

वाघोली (जि. पुणे) येथून महिला, तिचा दोन वर्षांचा मुलगा व दोन तरुण कामासाठी एमआयडीसीत आले होते. ही महिला पतीपासून वेगळी राहते. एमआयडीसीमध्ये काम करून ते विळद येथील एका वस्तीवर राहत होते.

नगर : विळद (ता. नगर) येथे काल (गुरुवारी) रात्री दहा वाजता पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली. सामाजिक कार्यकर्ते संजय बाचकर व ग्रामसेवकाने प्रसंगावधान राखून परिस्थिती हाताळली. 

हेही वाचा - साहेब, लवकर या तो प्रेमिकेचा सौदा करतोय

अधिक माहिती अशी : वाघोली (जि. पुणे) येथून महिला, तिचा दोन वर्षांचा मुलगा व दोन तरुण कामासाठी एमआयडीसीत आले होते. ही महिला पतीपासून वेगळी राहते. एमआयडीसीमध्ये काम करून ते विळद येथील एका वस्तीवर राहत होते. गावात काही अनोळखी लोक आल्याची चर्चा तीन दिवसांपासून सुरू होती. हे मजूर राहत असलेल्या वस्तीवरील घराशेजारी मोठा खड्डा खोदलेला होता. त्यामुळे हे लोक नरबळी देणार असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यातून काल (गुरुवारी) रात्री साडेआठ वाजता त्या वस्तीवर गावातील सुमारे 50 ते 60 लोकांचा जमाव चाल करून आला. 

जमावाने महिलेसह त्या दोन तरुणांना घेरले. गावातील सामाजिक कायकर्ते संजय बाचकर व ग्रामसेवक जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळी कोणीतरी ही माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यात कळविली.

पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर तातडीने घटनास्थळी पोचले. तोपर्यंत बाचकर व ग्रामसेवकाने जमावाला शांत केले होते. पोलिसांनी मजुरांची कसून चौकशी केली असता, ते विनापरवाना नगरमध्ये आल्याचे समजले.

दोन तासांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश केल्याचा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. मजुरांची रवानगी निवारा केंद्रात केली. संजय बाचकर, ग्रामसेवक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे पालघर दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. 

विळद येथील माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन चौघांची कसून चौकशी केली असता, ते कामासाठी एमआयडीसीत आल्याचे निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नरबळी अथवा अन्य कोणताही प्रकार तेथे सुरू नव्हता. 
- पवन सुपनर, पोलिस उपनिरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mob leaching avoided in Ahmednagar