विनयभंग : पाच वर्षांत अठराशे गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

विनयभंग : पाच वर्षांत अठराशे गुन्हे

अहमदनगर : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत विनयभंगाचे तब्बल १ हजार ८०० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातही या वर्षात ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्वाधिक ५७४ गुन्ह्याची नोंद झाली आहे.

समाजात महिलांवर अत्याचार झाल्यानंतर अनेकदा गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होते. संबंधित नातेवाईक चर्चा करून आपसांत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. असे होणे समाजाला घातक आहे.

असे असले, तरी गेल्या काही वर्षांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच, महिला जागृत होत आहेत, असे म्हटले जाते. महिलांनी विनयभंग होत असल्यास कोणाचीही पर्वा न करता पोलिसांत जायला हवे. गुन्हेगाराला शिक्षा झाली तरच त्याला चपराक बसेल.

७ वर्षांपर्यंतची आहे शिक्षा

विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सुधारित कायद्यानुसार या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळत नाही.

असे आहेत विनयभंगाचे गुन्हे

२०१८ - ३८१

२०१९ - ३१०

२०२० - ३२५

२०२१ - २१०

२०२२ - ५७४ (ऑगस्टपर्यंत)

।। जेणें वाढे अपकीर्ती । सर्वार्थीं तें वर्जावें ।।

ज्या कामामुळे समाजात आपल्याला किंमत राहत नाही, असे काम कोणीही करू नये. जे सत्य, खरे असते, तेच जगाला चांगले वाटते, पटते. जे खोटे असेल, जे अयोग्य असेल, अशी बाब शूरपणाने नाकारली पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, की जे खोटे आणि निंदनीय आहे, ते आपल्या कामाला काळिमा फासते. त्यामुळे कोणावरही अन्याय करू नये. विशेषतः महिलांवर समाजात अन्याय होऊ नये, यासाठी संतांनीही ठिकठिकाणी ऊहापोह केलेला आहे.

पुरुषी अत्याचार कधी संपणार?

अनेकदा रस्त्यावर विकलांग महिलांवर अत्याचार होतात. त्या बेवारस असतात. त्यामुळे गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येऊ शकत नाहीत. अशांसाठी ‘माऊली’ प्रकल्पात त्यांना हक्काचे घर दिले जाते. अशा महिलांशी चर्चा करताना, अत्याचाराच्या गुन्ह्यांची तीव्रता समाजात किती आहे, हे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे अत्याचाराच्या प्रकारांना ब्रेक बसायला हवा. अशा गुन्हेगारांना कठोर शासन होणे आवश्‍यक आहे.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्यात तरतूद आहे. कलम ३५४ हे त्यांपैकीच एक आहे. ज्या वेळी एखादी महिला विनयभंगाची तक्रार घेऊन येते, तेव्हा ती फिर्याद घ्यावीच लागते. पुढे पोलिस तपास करून आम्ही कोर्टासमोर सत्य मांडतो.

- अनिल कातकडे, पोलिस उपअधीक्षक, शहर

खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. एखाद्या महिलेने खोटी फिर्याद दिल्याचे कोर्टात सिद्ध झाले, तर तिच्याविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांनी अशा प्रकरणात सदसद्विवेक बुद्धीने तातडीने तपास केला पाहिजे.

- ॲड. अनुराधा येवले, विधिज्ञ