मकरसंक्रांतीनंतरच निधी समर्पण मोहीम : महेंद्र वेदक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

वेदक म्हणाले, की ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने निधी स्वीकारला जाईल. हे मंदिर तीन मजली असेल. त्यात पाच शिखरे असतील. निधी संकलनासाठी सर्वधर्मियांनी सहभाग घ्यावा.

अहमदनगर : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्यामुळे मकरसंक्रांतीपासून महिनाभर निधी समर्पण अभियान राबविले जाणार आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी 76 लढाया झाल्या. त्यात साडेतीन लाख लोकांनी प्राणाची आहुती दिली. एक हजार वर्षे टिकेल, असे मजबूत मंदिर बांधणार असून, त्यासाठी निधी संकलन केले जाणार असल्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सहमंत्री महेंद्र वेदक यांनी सांगितले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
विश्‍व हिंदू परिषद व राम सेवकांतर्फे जिल्ह्यात सुरू करण्यात येणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास निधी संकलन अभियानाची वेदक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, अभियान जिल्हा संयोजक गजेंद्र सोनवणे, विवेक कुलकर्णी, श्रीकांत जोशी, रामदास क्षीरसागर महाराज, ऍड. जय भोसले, अनिल रामदासी, शांतीभाई चंदे, राजेश झंवर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
वेदक म्हणाले, की ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने निधी स्वीकारला जाईल. हे मंदिर तीन मजली असेल. त्यात पाच शिखरे असतील. निधी संकलनासाठी सर्वधर्मियांनी सहभाग घ्यावा. प्रत्येक कुटुंबात जाऊन निधी संकलन केले जाईल. निधी संकलनासाठी सर्व राजकीय पक्षांकडे आम्ही जाणार आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निधी दिल्यास, तोही आम्ही आनंदाने स्वीकारू. 

नगरचे नाव योग्य 

सध्या राज्यात औरंगाबादचे नामकरण 'संभाजीनगर' करण्याची मागणी जोर धरत आहे. या मागणीस आमचे समर्थन आहे. परकीय नावे पुसली जावीत. मात्र, नगरचे नाव 'अंबिकानगर' करू नये. 'नगर' असेच राज्यभर या शहराला म्हटले जाते. नगरचे नाव योग्य असल्याचे वेदक म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A month long fundraising campaign will be implemented in Ahmednagar district from Makar Sankranti