मृत लेकराच्या न्यायासाठी आईचा संघर्ष; पोलिस चौकीसमोर आमरण उपोषण | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mother goes on hunger strike in front of police station to get justice for dead child

अहमदनगर | मृत लेकराच्या न्यायासाठी आईचा पोलिस चौकीसमोर उपोषण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

बोधेगाव (अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील आदित्य अरुण भोंगळे या अल्पवयीन मुलाने सात सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुलाची आई संगीता अरूण भोंगळे यांनी पोलिसांच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करत संबंधितावर कारवाईची मागणी केली. परंतु, दोन महिने उलटले तरी कारवाई होत नसल्याने मृताच्या आईने सोमवारी (ता. १५) बोधेगाव पोलिस चौकीसमोर आमरण उपोषण सुरू केले.

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील पोलिस चौकीसमोर सोमवारी उपोषणाचा पहिला दिवस होता. त्यावेळी मृत आदित्यची आई म्हणाली की, पतीच्या निधनानंतर आदित्य हा माझा एकुलता एक मुलगा जगण्याचा आधार होता. शेवगाव पोलीस ठाण्यातील चार पोलिसांच्या जाचास कंटाळून त्याने आत्महत्या केली. याबाबत शेवगाव येथे संबंधित पोलिसांविरुद्ध तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यावेळी पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, आम्ही संबंधित पोलिसांविरुद्ध कारवाई करू. तेव्हा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी माझा लेखी जबाबही नोंदवला. मात्र, संबंधितावर अजुन कुठलीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे संगीता भोंगळे यांनी सांगितले.

पहिल्या दिवशी पोलिस प्रशासनातर्फे उपोषणाची कुठलीही दखल घेतली नसल्याने उपोषणकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. उपोषणासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशबापू भोसले, रामनाथ राजपूरे, कासम शेख, माजी सरपंच रामजी अंधारे, भाऊराव भोंगळे, राजू इंगोले, कुंडलिक घोरतळे, रोहिदास भोगले, भगवान मिसाळ, शाहुराव खंडागळे, बबन कुरेशी यांनी पाठिंबा दिला.

हेही वाचा: शिवशाहिरांचे नगरशी अतूट स्नेहबंध


पोलिस 'वसूली'त गर्क

आठवडे बाजारच्या दिवशी स्थानिक पोलिसांनी बोधेगावमार्गे धावणाऱ्या बहुतांश ऑटो रिक्षा पोलिस चौकीत आणून संबंधित चालकांकडून 'आर्थिक' तडजोडीअंती हजारो रूपयांची वसूली केल्याची जोरदार चर्चा नागरिकांत आहे.

हेही वाचा: अहमदनगर : शिक्षकाकडून रुग्णालयात परिचारिकेचा विनयभंग

loading image
go to top