शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवणाऱ्या दानवेंना मंत्रिमंडळातून हाकला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

राहाता तालुका शिवसेनेतर्फे शिर्डी नगरपंचायत कार्यालयाजवळ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याला "जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी कोते बोलत होते.

शिर्डी : ""लाखाचा पोशिंदा असलेल्या बळिराजाला केंद्र सरकार व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे दहशतवादी ठरवू पाहत आहेत. पाकिस्तानी- चिनी म्हणत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,'' अशी मागणी शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी केली आहे. 

राहाता तालुका शिवसेनेतर्फे शिर्डी नगरपंचायत कार्यालयाजवळ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याला "जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी कोते बोलत होते.

या वेळी शिवसैनिकांनी दानवे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला; तो पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन वैयक्तिक जामिनावर सोडून दिले. 

हेही वाचा - अहमदनगरचे कलेक्टर राहतात महालात

कोते म्हणाले, ""भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असल्यामुळे, ते शेतकऱ्यांना पाकिस्तानी आणि चिनी म्हणत आहेत. शेतकरी थंडी- पावसामध्ये दिल्ली येथे आंदोलन करीत असताना भाजप शेतकऱ्यांची खिल्ली उडवीत आहे.

देशासह राज्यातील शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवू पाहत आहेत. यापुढच्या काळात असे वर्तन केल्यास शिवसेनेतर्फे रावसाहेब दानवे यांना प्रत्यक्ष "शिवसेना स्टाईल'ने उत्तर दिले जाईल.'' 

आंदोलनात अनिता जगताप, संजय शिंदे, अनिल बागरे, विजय जगताप, राहुल गोंदकर, सचिन कोते, संजय आहेर, भास्कर मोटकर, सोमनाथ गोरे, गंगाधर बेंद्रे, विजय गोल्हार, अतुल चौधरी, किरण जपे, दिनेश आरणे, संदीप बावके, अमोल गायके, दिनेश शिंदे आदी सहभागी झाले होते. 
..... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement against Danve at Ahmednagar