esakal | कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण रेमडीसिव्हीरसाठी धावपळ करू नये

बोलून बातमी शोधा

MP Dr. Sujay Vikhe Patil
कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण रेमडीसिव्हीरसाठी धावपळ करू नये
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पारनेर (अहमदनगर) : सध्या सगळीकडे कोरोना आजाराने थैमान घातले आहे. कोरोना आजार झालेल्या रूग्णांचे नातेवाईक रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी सगळीकडे धावपळ करत आहेत. मी सुद्धा डॉक्टर आहे म्हणून सांगतो की, रेमडीसिव्हीर हा कोरोनावरील रामबाण उपाय नाही. या इंजेक्शनशिवाय अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यासाठी धावपळ करू नये, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

तालुक्यातील विविध कोव्हिड सेंटर्सला रविवारी (ता. 25 ) डॉ. विखे पाटील यांनी भेटी दिल्या व तेथील रूग्ण, डॉक्टर यांच्याशी बातचित केली. भेटीनंतर पारनेर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कोरोनासारख्या महामारीच्या संकटाला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याची गरज आहे. जनतेच्या हितासाठी राजकारण सोडून या आजाराचा मुकाबला करावा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा: तिसगाव गटाने सामाजिक बांधिलकी जपली : कर्डिले

डॉ. विखे पाटील पुढे म्हणाले, रेमडीसिव्हीर इंजेक्शन मिळाले नाही तर आपण जगणार नाही, अशी भिती रूग्णांच्या व त्याच्या नातेवाईकांच्या मनात निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता ती चुकीची आहे. रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. ही भिती नागरिकांना मनातून दुर करण्याची गरज आहे. कारण अनेक रूग्णांनी रेमडीसिव्हीर शिवाय कोरोनावर मात केल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या इंजेक्शनसाठी लोक धावाधाव करत मागणी करत आहेत. त्या रूग्णांच्या नातेवाईकांची व रूग्णांची आर्थिक लुटमार होण्याची शक्यता आहे. विळद येथील हॉस्पिटलसह अनेक ठिकाणी तरूण असे रूग्ण रेमडीसिव्हीरचे सहा डोस देऊनही वाचू शकले नाहीत. तर दुसरीकडे एकही रेमडीसिव्हीर इंजेक्शन न देता वयोवृद्ध रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा: राळेगणसिद्धीत 50 बेडचे कोविड सेंटर सुरू

कोरोनावर कोणताही निश्चित असा उपाय किंवा औषध नाही. त्याचा अंदाज बांधता येत नाही. कोरोनापासून रूग्णांना वाचविण्यासाठी आज फक्त ऑक्सिजनची नितांत गरज आहे. त्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करत आहेत. अशा आजाराच्या साथीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून हा प्रश्‍न सुटणार नाही. आज मी तालुक्यातील सर्व कोरोना सेंटरला भेटी दिल्या त्यांच्या अडीअडचणी ऐकल्या आहेत. येत्या दोन दिवसात त्या सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही शेवटी डॉ. विखेपाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, तहसिलदार ज्योती देवरे, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे, डॉ. मनिषा उंद्रे, डॉ. अभिलाशा शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोठारी कुटुंबाकडून एक लाख 11 हजारांची मदत

कोरोनाच्या काळात तहसिलदार ज्योती देवरे व इतर सरकारी अधिकारी यांचा चांगला समन्वय आहे. हे सर्वजण अतिशय चांगले काम करत आहेत. औषधे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा, आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती या बाबत अतिशय नियोजनबद्ध काम तहसीलदार देवरे यांनी केले आहे. मुलभूत सुविधा नसतानाही मंगलकार्यालये, वसतीगृहांमध्ये कोरोना सेंटर सुरू करून उपचार केले जात आहेत, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे.