महावितरणकडून ग्राहकांना जून महिन्यातही शॉक

दत्ता उकिरडे
रविवार, 12 जुलै 2020

मार्च महिन्यापासून राशीनसह परिसरात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. जून महिन्यातही "जैसे थे' आहे.

राशीन : कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात वीज मीटरचे रीडिंग न घेता आकारण्यात आलेल्या बिलांमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलांचा शॉक बसला अाहे. ही बिले चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

महावितरणने वीजबिले आकारताना किमान अगोदरच्या बिलांच्या आधारे सरासरी बिले आकारणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता अंदाजे भरमसाट बिले आकारल्याने सामान्य ग्राहक बिले पाहून अवाक्‌ झाले आहेत.

हेही वाचा - नगरमध्ये कोरानाचे ३०३ रूग्ण

मार्च महिन्यापासून राशीनसह परिसरात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही. जून महिन्यातही "जैसे थे' आहे. घरगुती मीटरची बिलेही अनेकांना किमान वीस हजारांच्या पुढे आली असल्याच्या तक्रारी आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अनेकांचे व्यवसाय मंदीत असून, हातावर पोट असणाऱ्यांना काम मिळेनासे झाले आहे. घरगुती अतिरिक्त वीजबिलांनी आर्थिक समस्येत भर पडली आहे आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी राशीनसह परिसरातील वीजग्राहकांची अपेक्षा आहे.

अगोदर बिल भरा नंतर बघू, असे प्रकार महावितरणचे अधिकारी उत्तरे देत आहेत. त्यामुळे लोकांच्या संतापामध्ये भरच पडत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL shocks customers in June